सर्वोदय तीन ‘आर’वर आधारित- बालभाई

By Admin | Updated: November 17, 2014 22:59 IST2014-11-17T22:59:09+5:302014-11-17T22:59:09+5:30

सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते

Sarvodaya based on three 'R' - Balbhai | सर्वोदय तीन ‘आर’वर आधारित- बालभाई

सर्वोदय तीन ‘आर’वर आधारित- बालभाई

मित्र मिलनचा समारोप : तीन दिवसात कृषी, शिक्षण, स्त्री शक्तीवर विस्तृत चर्चा
पवनार : सर्वोदय हा तीन ‘आर’वर आधारित आहे. यात रिलीफ, रिफार्म आणि रिव्हॉल्यूशन हा सर्वोदयी मंत्र सांगितला आहे. तसेच हे विचार पाच तत्वावर आधारीत असून पहिला आंतरमन शुद्धी जी प्रार्थनेतून होते बर्हिमन शुद्धी जी साफ सफाईतून होते. श्रम ज्यामुळे आरोग्य चांगले व आहाराची व्यवस्था होते. शांती ज्यामुळे अशांती संपते तर पाचवे समर्पन ज्यामुळे आत्मशुद्धी मिळते, असे विचार मित्र मिलन सोहळ्याच्या अंतिम सत्रात बालभाई यांनी उपस्थितांसमोर मांडले.
येथील विनोबा भावे आश्रमात आयोजित मित्र मिलन संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. १५, १६, व १७ नोव्हेबर अशा तीन दिवस असलेल्या या संमेलनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. दरवर्षी आचार्य विनोबा भावे यांच्या पुण्यतिथी निमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या संमेलनाला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सर्वोदय मंडळी आपली उपस्थिती दर्शवून सर्वोदय विचार प्रचार-प्रसार करीत असतात.
मित्र मिलनचा समारोप करताना कालिंदी दीदी यांनी बलुतेदारीवर माहिती दिली. गत काळात बलुतेदारीवरून गावाची तुलना व्हायची. जर गावात चार बलुतेदार असतील तर गाव छोटे व आठ असतील तर मध्यम व १२ असतील तर मोठे गाव तसेच त्याची शेती असेल तो मालक जरी असला तरी त्याच्या उत्पन्नाचा तो एकटाच वाटेकरी नव्हती. गावात राहणारे न्हावी, धोबी, कुंभार, सुतार हे सर्व त्याच्या उत्पन्नाचे काही प्रमाणात भागीदार असायचे. अर्थात सर्व व्यवहार जरी कांचन मुक्त असले तरी व्यवहार मात्र सुरळीत व्हायचे. सृष्टीमध्ये सौंदर्य व समाजामध्ये सौजन्य राहिल्यास हे जग किती सुुंदर होईल, असे त्या म्हणाल्या. स्त्री शक्ती ही अदृष्य असून ती जर जागृत झाली तर क्रांती घडू शकते, हे त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. यासह या तीन दिवसात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील सर्वोदयी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिला दीदी यांनी संमेलनात सहभागी सर्व सर्वोदयी विचारांचे आभार मानले. या संमेलनाला नारायण देसाई, अमरभाई, अशोक बंग, महेंद्र भट, मोहनभाई, रमेशभाई, वसंतभाई, सुब्बाराव, सुभाष वाळेकर, वसंत फुटाणे, बाळभाई, बालविजय, कांचनताई, रेखाताई, ज्योतीबहण, गौतमभाई, मिनूताई, गंगाताई यांनी आपली उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केली. देश विदेशातून शेकडो सर्वोदयांनी या संमेलनाला हजेरी लावली.(वार्ताहर)

Web Title: Sarvodaya based on three 'R' - Balbhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.