पोळा साजरा करण्यासाठी सरपंच पशुपालकांच्या दारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:34+5:302021-09-09T04:35:34+5:30
सौंदड : मागील दीड-दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण विश्वच हैराण झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सार्वजनिक ...

पोळा साजरा करण्यासाठी सरपंच पशुपालकांच्या दारी !
सौंदड : मागील दीड-दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण विश्वच हैराण झाले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सार्वजनिक सण-उत्सवांच्या जल्लोषावर अनेक मर्यादा आल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असलेल्या सर्जा-राजाचा पोळा हा सण देखील महामारीच्या पाशात अडकला. गावात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळल्याने सार्वजनिक पोळा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला. दरम्यान गावातील सर्व पशुपालकांच्या दारापर्यंत जाऊन सरपंच गायत्री इरले यांनी बैलांची पूजा-अर्चना करुन गावकऱ्यांचा आशीर्वाद घेत पोळा साजरा केला.
पोळ्याला दरवर्षी गावातील आकरावर (ग्रामदैवत असलेले स्थान) पशुपालक-शेतकरी आपापल्या बैलजोड्यांना सजवून व रंगरंगोटी करून एकत्र होतात. बळीराजाला सुखाचे दिवस येवोत आणि गावात सुखसमृद्धी नांदावी यासाठी ग्रामदेवताची पूजा केली जाते. त्यानंतर पारंपरिक झडत्यांच्या सुरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या वेळी गावातील हजारो नागरिक उपस्थित असतात. यंदाची परिस्थिती ठीक नसल्याने सार्वजनिक उत्सवावर मर्यादा आणली गेली. मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला.
या अनुषंगाने सरपंच इरले यांनी स्वतः गावातील सर्व पशुपालकांच्या घरी जाऊन बैलांची पूजा केली. अशा प्रकारे ग्रामपंचायतने अनोख्या पद्धतीने पोळा साजरा केला. ही पद्धत अनेकांच्या मनात घर करून बसलीय. याप्रसंगी उपसरपंच सुनील राऊत, ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी विठ्ठले, सुरेखा नंदरधने, सुदेक्षणा राऊत, दिलीप डोंगरवार, वसंता विठ्ठले, नारायण सावरकर, अशोक विठ्ठले, रोशन शिवणकर, ज्योती बर्वे, युनेश भेंडारकर, रंजीत चुटे, शुभम फुंडे त्यांच्यासोबत होते.