सरपंचपदाचे आरक्षण आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST2021-02-05T07:51:23+5:302021-02-05T07:51:23+5:30
बोंडगावदेवी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. ग्रामपंचायतचे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी यावेळी पहिल्यांदा प्रथमच जाहीर करण्यात आले नव्हते. ...

सरपंचपदाचे आरक्षण आज
बोंडगावदेवी : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. ग्रामपंचायतचे सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी यावेळी पहिल्यांदा प्रथमच जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे गावा-गावांत सरपंचपद कुणाच्या वाट्याला जाते याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. गावकारभारी कोण होणार याची प्रतीक्षा आता संपली असून गुरुवारी (दि.२८) तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम तहसीलदार विनोद मेश्राम यांनी जाहीर केला आहे.
तालुक्यात ७० ग्रामपंचायत आहेत. अलीकडेच २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या काही वर्षांत होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनु. जाती, जमाती, नागिरकांचा मागास प्रवर्ग, खुला वर्ग तसेच वरील समूहातील महिलांसाठी सरपंचपदाची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अनु.जातीसाठी १२ पदे, अनु. जमातीसाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १९, खुला प्रवर्गासाठी २३ पदे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महिलांसाठी अनु.जाती ६ पदे, अनु. जमाती ८ पदे, नामाप्र ९ पदे, खुला प्रवर्ग १२ पदे आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील कोणत्या गावाला, कोणत्या वर्गासाठी सरपंचपद आरक्षित होणार आहे. त्याची सोडत गुरुवारी (दि.२८) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे. सरपंचपदाचे आरक्षण सोडतप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव, तलाठी यांनी उपस्थित राहावे, असे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी कळविले आहे. गावकारभारी निश्चित झाल्यानंतरच सरपंचपदाची रंगीत तालीम सुरू होणार.