पावसाच्या आगमनाने पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:39 IST2017-08-30T21:38:42+5:302017-08-30T21:39:23+5:30
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.

पावसाच्या आगमनाने पिकांना संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.
आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी जवळपास ५० टक्के रोवण्या खोळंबल्या होत्या. तर ज्या रोवण्या झाल्या त्या देखील संकटात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. संकटातील पिके वाचविण्यासाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात आले. त्यांच्या मदतीने धानाचे पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होती. पावसाअभावी रोवणी लांबल्याने उत्पादनात घट होणे निश्चित आहे. मात्र केलेला लागवड खर्च तरी भरुन निघावा यासाठी शेतकºयांचे प्रयत्न सुरू होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. सोमवारी आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ महसूल मंडळापैकी आठ मंडळामध्ये अतिवृष्टिची नोंद झाली.
तिरोडा तालुक्यातील परसवाडा ६६.६ मिमी., तिरोडा १२४.४ मिमी., मुंडीकोटा ८० मिमी., अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ७२ मिमी., बोंडगावदेवी ८७ मिमी., अर्जुनी मोरगाव १२६.४ मिमी., महागाव १३५.४ मिमी., सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे ६२.४ मिमी. पावसाची नोंद झाली.
पाणी साठ्यात वाढ
गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुजारीटोला, कालीसरार,सिरपूरबांध, इटियाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.