समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून ?

By Admin | Updated: September 26, 2016 01:51 IST2016-09-26T01:51:52+5:302016-09-26T01:51:52+5:30

विकासकामे कोणत्याही निधीतून होवो, मात्र शेवटी पैसा हा शासनाचाच असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे

Samaj Bhavna BJP funds or government funds? | समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून ?

समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून ?

बिजेपार : विकासकामे कोणत्याही निधीतून होवो, मात्र शेवटी पैसा हा शासनाचाच असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे भूमिपूजन असो किंवा लोकार्पण, त्यात लोकप्रतिनिधींना पाचारण करणे हा प्रोटोकॉल असतो. मात्र नक्षल फंडातून डोमाटोला येथे तयार समाजभवनाच्या लोकार्पण सोहळ्यास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना डावलून प्रोटोकॉलचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे समाजभवन भाजपच्या फंडातून की शासनाच्या तिजोरीतून? असा सवाल उपस्थित झाला आहे.
नक्षल निधीतून अनेक विकास कामांसाठी व जनतेकरिता सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून अनेक बाबींसाठी शासनाच्या तिजोरीतून निधी दिला जातो. जरी नक्षल निधीमार्फत हे विकास काम होत असले तरी शेवटी शासनाचा पैसा असतो. शासनाद्वारे खर्च केलेल्या कोणत्याही कामाचे भूमिपूजन असो किंवा लोकार्पण सोहळा असो, त्यामध्ये जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना पाचारण करणे हा प्रोटोकॉल समजला जातो. परंतु ग्रामपंचायत पांढरवाणी अंतर्गत डोमाटोला या गावी मागील वर्षी नक्षल निर्मूलन निधीतून दहा लाख रूपयांच्या खर्चातून समाजभवन बांधण्यात आले. त्याचा रविवारी (दि.२५) ला लोकार्पण सोहळा पार पडला.
त्याकरिता निमंत्रण पत्रिका काढण्यात आली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मंडल पांढरवाणी द्वारे कार्यक्रम पत्रिका काढण्यात आली. यावर पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे व जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे यांंनी नाराजी व्यक्त करून निषेध केला आहे.
कार्यक्रमाबाबत येथील सरपंच व ग्रामसेवकालासुद्धा कळविण्यात आले नाही. जर हे भवन शासनाच्या तिजोरीतून तयार करण्यात आले तर भाजप आपल्या पक्षाच्या कार्यक्रमासारखे कुणालाही न विचारता व न आंमत्रित करता सदर कार्यक्रम कसे करीत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या फंडातून जर भवन निर्माण झाले असते तर यावर कुणाचेही आरोप व आक्षेप नसते. अशा प्रकारच्या आयोजन करण्यावर शासन स्तराववरून बंदी आणावी व जाणूनबुजून दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे अपमान करणे थांबवावे.
याकरिता आमदारांनीसुद्धा निमंत्रण ठेवून त्यांना प्रोटोकॉलसंबंधी सूचना द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यापुढे जर अशा प्रकारचे आयोजन केल्यास त्यांना काळेझेंडे दाखवून निषेध करण्यात येईल, असा ईशारा पं.स. सदस्य दिलीप वाघमारे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Samaj Bhavna BJP funds or government funds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.