जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मालाची खरेदी-विक्री बंदच
By Admin | Updated: July 15, 2016 02:00 IST2016-07-15T02:00:12+5:302016-07-15T02:00:12+5:30
राज्य शासनाने शेतकरी हितात निर्णय घेवून एक आदेश काढला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर अडत (दलाली) न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावे

जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मालाची खरेदी-विक्री बंदच
शासन निर्णयाला विरोध : व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा
गोंदिया : राज्य शासनाने शेतकरी हितात निर्णय घेवून एक आदेश काढला. त्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर अडत (दलाली) न घेता व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावे, असे ठरले. मात्र या आदेशाच्या विरोधात गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी धान खरेदी बंद केली आहे. गुरूवारीसुद्धा खरेदी बंदच होती.
या प्रकारामुळे धान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे धान खरेदी होत नसल्यामुळे ते सुद्धा अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पन्नाच्या विक्रीवर अडत घेतली जात होती, हे स्पष्ट आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितात निर्णय घेवून ५ जुलै रोजी शासनादेश काढला. त्यात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून अडत घेण्यात यावी, असे नमूद आहे. सदर आदेश १२ जुलै रोजी गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना मिळताच त्यांनी धान खरेदी बंद केली. त्यामुळे बुधवार व गुरूवार या दोन्ही दिवशी शेतकऱ्यांच्या धानाची विक्री होवू शकली नाही. या आदेशाने शेतकरी सुखावले आहेत तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
या प्रकाराबाब गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव सुरेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, व्यापाऱ्यांनी धान खरेदी पूर्णत: बंद केली आहे. आता त्यासाठी बाजार समितीमध्ये शुक्रवार (दि.१५) व्यापाऱ्यांसह बैठक ठेवण्यात आली आहे.
या बैठकीत व्यापारी काय निर्णय घेतात, त्यानंतर पुढील बाब स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)