साखरीटोला-सातगाव, गांधीटोला रस्त्याची दुर्गती
By Admin | Updated: December 17, 2015 01:50 IST2015-12-17T01:50:25+5:302015-12-17T01:50:25+5:30
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने सदर रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठिण झाले आहे.

साखरीटोला-सातगाव, गांधीटोला रस्त्याची दुर्गती
साखरीटोला: सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने सदर रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठिण झाले आहे. मात्र रस्त्याचे अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे सदर मार्ग केव्हा होणार, असा प्रश्न ग्रामवासीयांना पडला आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून साखरीटोला ते तिरखेडी मार्गाला मंजूरी मिळून सहा महिन्यांचा कालावधी लोटला. त्यानुसार कंत्राटदाराने तिरखेडी ते गांधीटोल्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र मागील तीन महिन्यांपासून गांधीटोला ते साखरीटोला मार्ग तसाच पडून आहे. सदर बांधकामाचा निधी संपल्याची ओरड करुन कंत्राटदाराने काम केले नाही. हा डांबर रस्ता उखडून मातीमिश्रीत गिट्टीचा मलबा सदर मार्गावर टाकला व रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावरील गिट्टी निघाली आहे.
त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. मध्यंतरी कंत्राटदारामार्फत काम चालू करण्यात आले होते. मात्र मातीमिश्रीत खडी व मलब्याचा वापर होत असल्याने सातगाव येथील काही लोकांनी काम थांबविले होते. त्यामुळे सध्या काम बंद असून सदर मार्ग केव्हा बनणार असा प्रश्न ये-जा करणाऱ्यांना पडला आहे. सारखीटोला ते सालेकसा असा तालुक्याचा मार्ग असून अनेक गावकऱ्यांना नेहमी सालेकसा येथे विविध कामासाठी जावे लागते. तसेच सदर मार्गावर असणाऱ्या गावातील विद्यार्थी शिक्षणाकरिता साखरीटोला येथे येत असतात. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)