सखींना महिला गौरव पुरस्कार
By Admin | Updated: March 24, 2017 01:36 IST2017-03-24T01:36:19+5:302017-03-24T01:36:19+5:30
लोकमत सखी मंचच्या वतीने महिला गौरव व होली मीलन कार्यक्रमासह रंगारंग कार्यक्रमांची मेजवाणी सखींना देण्यात आली.

सखींना महिला गौरव पुरस्कार
विविध सांस्कृतिक कार्यक्रम : सखी मंच आमगावचा स्तुत्य उपक्रम
आमगाव : लोकमत सखी मंचच्या वतीने महिला गौरव व होली मीलन कार्यक्रमासह रंगारंग कार्यक्रमांची मेजवाणी सखींना देण्यात आली. आमगाव येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत सखींचा गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. तसेच होळई स्नेहमीलनासह विविध रंगारंग कार्यक्रमाचा सखींनी आस्वाद घेतला.
अध्यक्षस्थानी कुभारटोलीचे सरपंच सुनंदा येरणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी बाल कल्याण सभापती सविता पुराम, बालविकास प्रकल्प अधिकारी रंजना गौर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभना सिंग, वक्ते म्हणून डॉ. ममता उंदीरवाडे, कुंभलवार, मोहिणी निंबार्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन श्रद्धेय जवाहरलाल दर्डा व सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.‘ ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला भक्तीमय वातावरणाची जोड देण्यात आली.
लोकमत सखी मंच सदस्य मोहिमेत अधिक परिश्रम करणारे वीणा हरिहर मानकर, संध्या उजवणे, ममता तुरकर, निशा दरवडे, गीता येळे, मंगला शिंगाडे, वर्षा शर्मा तसेच उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. शोभना सिंग, लेखिका व कवियित्री सुनिता मल्ल यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी सखींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच भगवती इंग्रजी कुंभारटोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. एकल नृत्यातून सानिका ब्राम्हणकर, विधी गुप्ता, आराध्या फुंडे, षष्ठी तुरकर, पलक निर्वाण आदिंनी नारीशक्तीचे प्रदर्शन केले.
यानंतर मंगला शिंगाडे, ममता तुरकर, सुनिता मल्ल यांनी ‘सासू आणि सून’ यांच्यातील ‘संवाद’ या मालिकेतून सादर केले. सविता पुराम यांनी सखींच्या मार्गदर्शनात ‘ज्याला स्त्री आई म्हणून कळली तेथे जिजा मातेचा शिवबा झाला, ज्याला बहीण म्हणून कळली त्याचे मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला मैत्री कळली त्याचे राधेचा शाम झाला. ज्याला पत्नी म्हणून कळली त्याचे सीतेचा राम आणि सावित्रीचा ज्योतिबा झाला, या संवेदन शब्दरुपातून महिलांना शक्तीचे स्वरूप पटवून दिले.
डॉ. ममता उंदिरवाडे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर सखींना मार्गदर्शन केले. सरपंच सुनंदा येळणे यांनी या वेळी होली मीलन कार्यक्रमात सखींनी एकमेकांना गुलाल लावून आनंद द्वगुणीत केला. संचालन जया राजीव फुंडे यांनी केले. आभार वर्षा शर्मा यांनी मानले. कार्यक्रमासाठी सखी मंचच्या सदस्यांनी व विद्यानिकेतन कॉन्व्हेंटच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)