लोकमत न्यूज नेटवर्ककोहमारा : सौंदड ग्रामपंचायतचा भाग वगळता संपूर्ण सडक अर्जुनी तालुका इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने गौण खनिज उत्खननावर बंधने आहेत. वाळू गौण खनिजात मोडत असल्याने या तालुक्यात शासकीय वाळू डेपो सुरू होण्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.
सडक अर्जुनी तालुक्याचा बराचसा भाग हा वनक्षेत्राने व्यापला आहे. याचा बराच भाग हा नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येतो. राष्ट्रीय उद्यान वन्यजीव विभागाच्या राखीव क्षेत्रालगत आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या मुक्त विहारासाठी व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सौंदड वगळता संपूर्ण तालुक्यातच गौण खनिज उत्खननावर बंधने आली आहेत. तालुक्यातून जात असलेल्या राष्ट्रीय मार्गालासुद्धा वन्यजीवांच्या मुक्त विहारासाठी अंडरपास मार्ग तयार करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मुख्यतः दगड, खडी माती, मुरूम तसेच वाळू यासारखे गौण खनिज महत्त्वाचे घटक आहेत.
सडक अर्जुनी तालुका विपुल निसर्ग संपत्तीने नटला असून तालुक्यातून चूलबंद, शशीकरण या मुख्य नद्यांसह काही लहान-मोठ्या नद्या वाहतात. या नदीपात्रात विपुल प्रमाणात वाळूसाठा आहे. पण सडक अर्जुनी तालुक्यात गौण खनिज उत्खननावर बंधने असल्याने वाळू उत्खननावर बंधने तर येणार नाही, अशी शंका वर्तविली जात आहे. त्यामुळे शासकीय वाळू डेपो सुरू होण्याची आशा धूसर झाली आहे.
मुबलक साठा तरी वाळू मिळेनातालुक्यातून वाहणाऱ्या नदीपात्रात विपुल प्रमाणात वाळूसाठा आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून नवीन वाळू धोरणानुसार रेती घाटांचे लिलाव न झाल्याने व वाळू डेपो तयार न झाल्याने रेती उपलब्ध असूनही घरकूल व इतर बांधकाम करण्यासाठी वाळू मिळत नसल्याने घरी आड अन् पाण्यासाठी लढ, असे म्हणण्याची वेळ या तालुकावासीयांवर आली आहे. लोकांना वाळू मिळत नसल्यामुळे घरकुलाचे काम थांबले आहेत. याकरिता नागरिकांनी वाळू मिळण्याकरिता तहसीलदार व पदाधिकाऱ्यांना साकडे घातले आहेत.
नद्यांनी बदलला प्रवाह मार्गजिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी रेतीघाट लिलाव व वाळू डेपो तयार करण्यासाठी सादर केलेल्या आराखड्यानुसार तालुक्यातील घाटबोरी तेली, पळसगाव राका पिपरी, सौंदड, सावंगी १, सावंगी २ या रेती घाटांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षापासून एकही घाट लिलाव न करता वाळू डेपो सुरू न झाल्याने रेती तस्करीत वाढ झाली. आपल्या सोयीनुसार नदीपात्रातून वाटेल तेथून रेतीचा अवैध उपसा केल्याने नद्यांचा प्रवाह मार्ग बदलला आहे. शशीकरण नदीवरील सावंगी घाटाचा वाळू डेपोत समावेश असला तरी या नदीवर ६०० मीटर परिघात कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा तयार होत असल्याने सावंगी घाटाच्या वाळू डेपोत समावेश असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.