सडक-अर्जुनी तालुकाही झाला ग्रीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST2021-02-10T04:29:45+5:302021-02-10T04:29:45+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुकाही ग्रीन झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी ...

सडक-अर्जुनी तालुकाही झाला ग्रीन
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुकाही ग्रीन झाला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि.९) जिल्ह्यात फक्त २ रुग्ण बाधित आढळले असून, तब्बल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यात सडक-अर्जुनी तालुका कोरोनामुक्त झाला.
जिल्ह्यात सोमवारी एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नव्हता व त्यात बाधितांची भर पडली होती, तर मंगळवारी मात्र फक्त २ रुग्णांची भर पडली व तब्बल १२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला. यामुळेच आता सालेकसापाठोपाठ सडक-अर्जुनी तालुका ग्रीन झाला. विशेष म्हणजे, यानंतर आता अशीच दिलासादायक स्थिती राहिल्यास आणखी ४ तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. यामध्ये गोरेगाव तालुक्यात १, आमगाव २, देवरी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात फक्त २ रुग्ण उरले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८० क्रियाशील रुग्ण उरले आहेत. त्यात गोंदिया व तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहेत. जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र, मध्यंतरी तिरोडा तालुक्याला मागे टाकून आमगाव तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला होता. मात्र, आमगाव तालुक्यातील स्थिती नियंत्रणात आल्याने आता आमगाव तालुका सावरला असून, तेथे फक्त २ क्रियाशील रुग्ण असल्याने तिरोडा तालुका पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.