प्रमुख रस्त्यावरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट
By Admin | Updated: July 15, 2015 02:19 IST2015-07-15T02:19:33+5:302015-07-15T02:19:33+5:30
स्थानिक मुख्य रस्त्यावरील बसस्थानक, दुर्गा चौक व ठाणा चौकापर्यंत गेल्या कित्येक दिवसांपासून मोकाट ...

प्रमुख रस्त्यावरच मोकाट जनावरांचा सुळसुळाट
गोरेगाव : स्थानिक मुख्य रस्त्यावरील बसस्थानक, दुर्गा चौक व ठाणा चौकापर्यंत गेल्या कित्येक दिवसांपासून मोकाट जनावरांचे कळप पाच वाजतापासून मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच उभे असतात. पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. मुख्य रस्त्यावर जनावरांच्या कळपांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
स्थानिक मुख्य रस्त्यावरुन मोठमोठी वाहने भर वेगाने धावतात. गोरेगाववरुन गोंदियाकडे व कोहमाराकडे मोठ्या प्रमाणात वाहने चालतात. तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे चारचाकी, दुचाकी व सायकल स्वारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या मधोमध गायी, बैल व शेळ्यांचा सुळसुळाट वाढल्याने अनेकवेळा अपघातही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोमालकांनी आपली जनावरे चारा नसल्यामुळे मोकाट सोडल्याची चिन्हे रस्त्यावरील जनावरांचे अनेक कळप पाहून दिसतात.पाच वाजता शाळा-कॉलेजला सुटी झाली की, मोठ्या प्रमाणात सायकलस्वार विद्यार्थ्यांची ये-जा सुरू होते. यावेळी चारचाकी वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कोंडवाड्यात टाकावे व मोकाट जनावरांचा सुळसुळाटाला प्रतिबंध घालावा, अशी मागणी आहे. गोरेगाव येथील सर्व कार्यालये मुख्य रस्त्याच्या बाजुलाच असल्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेक ठिकाणी वाहने रस्त्याच्या खाली उतरवून नेले जातात. जनावरांच्या कळपांमुळे वाहन काढण्यासाठी जागा सापडत नाही. त्यामुळे एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी समस्या आहे. (तालुका प्रतिनिधी)