ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:00+5:302021-02-06T04:53:00+5:30
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याची आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख आहे. या जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब ...

ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज ()
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याची आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख आहे. या जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत आहे. अशातच एखादा लहान-सहान उद्योग करायचा म्हटला तरी भांडवल कोठून आणायचे, असा प्रश्न ग्रामीण भागातील गोरगरिबांना पडतो. मात्र, आता त्यांच्या मदतीसाठी नाबार्ड व विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने पुढाकार घेतला असून, उद्योग उभारण्यासाठी इच्छुकांना कर्ज दिले जाणार आहे.
यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील विदर्भ ग्रामीण कोकण बॅंकेतील अधिकाऱ्यांना पंचायत समिती येथे बोलावून ग्रामीण भागातील लोकांना उद्योगासाठी कर्ज कसे वितरीत करता येतील, यासाठी त्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला विदर्भ ग्रामीण कोकण बॅंकेचे महाव्यवस्थापक एस. टी. सावंत, ‘नाबार्ड’चे नीरज जागरे, प्रादेशिक व्यवस्थापक प्रभाकर धकाते उपस्थित होते. पाच महिलांच्या समूहाला हे कर्ज दिले जाणार असून, गोंदिया जिल्ह्यातील १० हजार कुटुंबांना हे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज घेऊन महिलांना आपले लहान-सहान उद्योग सुरु करून आत्मनिर्भर बनण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.