ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:52+5:302021-03-18T04:28:52+5:30
गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीतील नावात झालेल्या चुकीची दुरुस्ती करून पहिली किस्त जमा करून दिल्याबद्दल चार हजार ...

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात
गोंदिया : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीतील नावात झालेल्या चुकीची दुरुस्ती करून पहिली किस्त जमा करून दिल्याबद्दल चार हजार रुपयांची मागणी करून लाच स्वीकारणारा कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमगाव येथे बुधवारी (दि.१७) ही कारवाई केली. पंकज श्रीराम चव्हाण (२८), असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदार शेतकरी असून, सन २०१९-२० मध्ये ग्रामपंचायत खुर्शीपारटोलाअंतर्गत घरकुल यादीत त्यांचे चुकीचे नाव नोंद झाल्याने यादीत त्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाचे नाव नोंदविण्यात आल्याचे दिसले. यावरून त्यांनी जानेवारी महिन्यात अभियंता चव्हाण यांची भेट घेऊन यादीत नावाची दुरुस्ती करून पहिली किश्त जमा करून देण्याची विनंती केली होती. यावर चव्हाण याने नावाची दुरुस्ती व २० हजार रुपयांची पहिली किस्त जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून पहिली किस्त जमा करून दिली होती.
काही दिवसांनी चव्हाण खुर्शीपारटोला येथे घरकुल सर्वेक्षणाकरिता गेला असता तक्रारदाराने दुसऱ्या किस्तबद्दल विचारले असता त्याने अगोदरच्या पाच हजार रुपयांची मागणी केली, तसेच घरकुल फोटो आणून द्या, दुसरी किस्त जमा करून देतो असे म्हटले. यावर तक्रारदाराने सोमवारी (दि.१५) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि.१७) आमगाव येथे सापळा लावला असता चव्हाण याने तक्रारदारास तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी करून पैसे स्वीकारले असता पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात लाप्रका १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.