ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा ‘आॅक्सिजनवर’
By Admin | Updated: October 19, 2015 02:06 IST2015-10-19T02:06:15+5:302015-10-19T02:06:15+5:30
दररोज १५० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचारादरम्यान केव्हाही प्रसुती आणि अपघातांचे रुग्ण येऊन धडकने.

ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा ‘आॅक्सिजनवर’
निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त : ओपीडी अस्थायी डॉक्टराच्या भरवशावर, बेडवर स्वच्छतेचा अभाव
विजय मानकर सालेकसा
दररोज १५० पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची तपासणी व औषधोपचारादरम्यान केव्हाही प्रसुती आणि अपघातांचे रुग्ण येऊन धडकने. अशात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात मिळणारी आरोग्य सेवा कशी असेल याची कल्पना आपण करु शकता. यामुळेच येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण सेवा ‘आॅक्सिजनवर’ असल्याचे चित्र प्रत्यक्ष पहावयास मिळत आहे.
३२ वर्षापूर्वी सालेकसा तालुका अस्तित्वात आला असून त्यानंतर १० वर्षात सालेकसा येथील स्थानिक आणि तालुक्यातील गरीब जनतेला मोफत व उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला काही वर्ष ठिकठाक चालल्यानंतर येथे रिक्त पदांचे असे ग्रहण लागले की ते काही सुटले नाही. आज घडीला येथे निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद मंजूर असून मागील १६ वर्षांपासून रिक्त होते. अपवाद म्हणूूून सन २०१३-१४ मध्ये काही महिन्यापर्यंत ते पद भरले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन पदांमधील एकच पद भरले असून डॉ. सुषमा नीतनवरे पदावर कार्यरत आहेत. वर्ग ३ अंतर्गत अधीपरिचारिकांची सात पदे मंजूर असून दोन पद अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. एक्सरे तंत्रज्ञाचे एक पद मंजूर असून ते सन २००९ पासून रिक्त आहे. या पदावरील कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर दुसरे तंत्रज्ञ आलेच नाही. एवढेच नाही तर सन २०१० पासून एक्सरे मशीन सुद्धा बंद पडून आहे. प्रयोगशाळा सहायकाचे एक पद मंजूर असून मागील वर्षापासून रिक्त आहे. या पदावर असलेले कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद भरण्यात आले नाही.
वर्ग ४ अंतर्गत सात पद मंजूर असून त्यातील चार पद रिक्त आहेत. यात कक्ष सेवकांच्या चार पैकी तीन पद सन २०११ पासून रिक्त आहेत. सफाईगाराच्या दोन पैकी एक पद सन २०१० पासून रिक्त आहे. शिपाहीचे एक पद भरलेले आहे.
कनिष्ठ लिपिकाचे तीन पद मंजूर असून एक पद भरलेले आहे. तर एक पद सहा महिन्यापासून आणि दुसरे चार वर्षापासून रिक्त आहे. एकंदरित निम्यापेक्षा जास्त पदे रिक्त असून आरोग्य सेवेवर थेट परिणाम होत आहे.
येथे रुग्णांना दाखल करण्यासाठी एकूण ३० बेड ची व्यवस्था आहे. परंतु बेडची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर बहुतांश बेडला डाग लागलेले दिसून आले व असहनीय दुर्गंधी येत असते. त्यामुळे अनेक रुग्ण भर्ती होण्यास घाबरतात व वेळेवर औषधोपचार मिळत नाही. वैद्यकीय अधिकारी रुग्णांसोबत संवेदनहिनता दाखवतात, अशी तक्रार अनेक रुग्णांकडून येत असल्यामुळे येथे सामान्य रुग्ण सुद्धा जास्त येऊ पाहत नाही. महिन्यात सरासरी २० रुग्ण प्रसुतीचे, २५ अपघातांचे तसेच येथे दररोज १५० पेक्षा जास्त बाह्यरुग्ण औषधोपचार करण्यासाठी येतात. तसेच केव्हाही अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विष प्राशन करणारे रुग्ण सुद्धा येत असतात.
मात्र या पैकी अनेकांना उपचार न करता गोंदिया रेफर करण्यात येते. याशिवाय क्षयरोग, मधुमेह, कृष्ठरोग इत्यादी गंभीर आजारांचे रुग्ण सुद्धा औषधोपचार घेतात. परंतु येथे नियमित वैद्यकीय अधिकारी आणि पुरेशे आरोग्य कर्मचारी नसल्याने हे ग्रामीण रुग्णालय शेवटच्या घटका मोजत आहे. तर इमारत शोभेची वास्तू बनून राहणार आहे.