नोटांच्या ‘एक्स्चेंज’साठी धावाधाव

By Admin | Updated: November 11, 2016 01:31 IST2016-11-11T01:31:52+5:302016-11-11T01:31:52+5:30

आपल्याकडील ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी सर्वांनी गुरूवारी बँकांमध्ये धाव घेतली.

Running for 'exchange' of notes | नोटांच्या ‘एक्स्चेंज’साठी धावाधाव

नोटांच्या ‘एक्स्चेंज’साठी धावाधाव

बँकांमध्ये रांगा, कर्मचाऱ्यांची तारांबळ : अनेकांनी निवडला सोन्यात पैसे गुंतवणुकीचा पर्याय
गोंदिया : आपल्याकडील ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी सर्वांनी गुरूवारी बँकांमध्ये धाव घेतली. त्यामुळे सकाळपासून बँकांमध्ये चांगलीच गर्दी उसळली होती. परंतु जमा केलेल्या जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा मिळविण्यात बहुतेक जणांना अपयश आले. मोजक्याच बँकांमध्ये नवीन नोटा उपलब्ध असल्याने आजही नागरिकांची तारांबळ उडाली. दुसरीकडे जुन्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी बड्या लोकांनी चढ्या दराने का असेना, सोने खरेदी सुरू केली आहे.
गुरूवारपासून (दि.१०) नोटांचे ‘एक्सचेंज’ सुरू झाल्याने नोटा बदलून घेण्यासाठी सर्वच बॅकांत नागरिकांची गर्दी केली. त्यामुळे बँकांत पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ज्यांच्याकडे ५०० व १००० रूपयांच्या नोटा आहेत अशांनी त्या बँकेत जमा करून त्या बदल्यात नवीन नोटा घेण्याची सोय केली. पण प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागले. काही लोकांना तर बँकांच्या बाहेरही ताटकळत उभे रहावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने बँकांत पोलीस कर्मचाऱ्यांचीही ड्युटी लावण्यात आल्याचे दिसले. गर्दीमुळे बँक कर्मचारीही काहीसे गोंधळले होते.
बँकेत एकावेळी कितीही पैसे जमा करता येणार असले तरी त्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत आपण येणार नाही यासाठी प्रत्येक जण काळजी घेत आहे. (शहर प्रतिनिधी)

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत
‘एक्सचेंज’साठी नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेत नागरिकांच्या सुविधेसाठी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. बँकेने दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर लावले असून एक्सचेंज काऊंटर सुरू केले. तरीही नागरिकांची गर्दी लक्षात घेता आणखी काऊंटर वाढविण्याची गरज दिसून आली. बँकेत आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा देण्यासाठी बोलाविण्याची वेळ आली.
नवीन नोटांबद्दल उत्सुकता
नोटा बदलून घेण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना सध्या शासन निर्देशानुसार चार हजार रूपयांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. यात सध्या ज्या बँकांकडे नवीन नोटा आल्या नाही त्यांच्याकडून १०० रूपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियात नवीन नोटा आल्याचे दिसले. नवीन नोटा दिसायला कशा आहेत याबद्दलही अनेकांना उत्सुकता होती. ज्यांना नवीन नोटा मिळाल्या त्यांच्याकडील नोट हातात घेऊन न्याहाळण्याचा प्रयत्न लोक करीत होते.

- महावितरण आजच्या दिवस स्वीकारणार जुन्या नोटा
महावितरणच्या वीज बिल केंद्रांवर जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत असा मोबाईल संदेश सकाळी वीज ग्राहकांना मिळाला. मात्र गुरूवारी सायंकाळी कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये शुक्रवारी केवळ एक दिवस जुन्या नोटा स्वीकारण्याची व्यवस्था करीत असल्याचे कळविले.
रात्री १२ पर्यंत काऊंटर सुरू
वीज कंपनीकडून शुक्रवारी (दि.११) मध्यरात्री १२ वाजतापर्यंत बिल भरणा केंद्रांवर ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार महावितरणकडून ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जात आहे.
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ज्या ग्राहकांची बील भरण्याची मुदत ९ ते १४ नोव्हेंबर आहे ती वाढवून १५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. तसेच आॅनलाईन वीज भरणा करण्यासाठी महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपची सुविधा नेहमीसाठी सुरू राहणार आहे.

Web Title: Running for 'exchange' of notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.