नवेगावबांध जलाशयावर नियमबाह्य नौकाविहार

By Admin | Updated: January 1, 2017 01:45 IST2017-01-01T01:45:08+5:302017-01-01T01:45:08+5:30

शासनाची परवानगी नसतानाही मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांकडून नवेगावबांध जलाशयावर नियमबाह्यपणे सर्रास नौकाविहार सुरु आहे.

Ruleless Boating on Navegaonbandh reservoir | नवेगावबांध जलाशयावर नियमबाह्य नौकाविहार

नवेगावबांध जलाशयावर नियमबाह्य नौकाविहार

दुर्घटनेला आमंत्रण : वर्षसमाप्ती व नववर्षाच्या सुटीत पर्यटकांची रेलचेल
संतोष बुकावन अर्जुनी-मोरगाव
शासनाची परवानगी नसतानाही मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांकडून नवेगावबांध जलाशयावर नियमबाह्यपणे सर्रास नौकाविहार सुरु आहे. वर्षसमाप्तीच्या पर्वावर नवेगावबांध येथे पर्यटकांची रेलचेल दिसून येत आहे. त्यात हौसेने नौकाविहार करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मात्र त्यांची ही लालसा कधीही जीवावर बेतू शकते. असे असताना स्थानिक प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. राष्ट्रीय उद्यान परिसरातील तीनही विभागाचे अधिकारी याबाबतची जबाबदारी एकमेकांवर टाकत आहेत.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान परिसरात मोठा तलाव आहे. कोळी बांधव येथे मासेमारी करतात. मासेमारी करताना लाकडी डोंग्याचा वापर केला जातो. येथे जे.टी.प्वार्इंट व संजय कुटी हे तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचे दोन स्थान आहेत. कोळी बांधव मासेमारी सोबतच पर्यटकांची नौकाविहाराची हौस भागवितात. जे.टी.प्वाईंट येथील दर प्रतिमानसी २० रुपये आहेत, तर संजयकुटी येथून चार व्यक्तींसाठी ५०० रुपये दर ठरलेले आहेत. हा गोरखधंदा अनेक वर्षापासून सर्रास सुरू आहे.
एका लाकडी डोंग्यावर चार व्यक्ती बसण्याची क्षमता आहे. मात्र तब्बल दहा-दहा व्यक्ती बसविले जातात. याठिकाणी नौकाविहार करण्याची शासनाकडून अधिकृत परवानगी नाही. तलावात मासेमारी करण्याची मत्स्य संस्थेकडून कोळी बांधवांना परवानगी आहे. मात्र याचा गैरफायदा घेत सर्रास नौकाविहाराचा गोरखधंदा सुरू आहे. हे अधिकृत कार्यालयीन प्रशिक्षित नावाडी नाहीत. याशिवाय तलावात नौकाविहार करणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा नाही. त्यांना जीवन सुरक्षा कवच (लाईफ जॅकेट) पुरविले जात नाही. त्यामुळे संकटसमयी बचावाची संधी उपलब्ध होत नाही.
नववर्षाच्या प्रारंभी राष्ट्रीय उद्यान परिसरात आणखी पर्यटकांची रेलचेल वाढण्याची शक्यता आहे. कोळी बांधवासाठी ही पर्वणीच आहे. मात्र ही पर्वणी पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते अगदी हाकेच्या अंतरावर वनाधिकाऱ्यांचे निवासस्थान, वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही, याचे रहस्य गुलदस्त्यात आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

-दंडाचे फलक नावापुरतेच
सध्या राष्ट्रीय उद्यानाची देखरेख करण्याची जबाबदारी वन्यजीव, वनविकास महामंडळ व जलसंपदा विभागाकडे आहे. कुठलीही बाधा उत्पन्न झाल्यास एकमेकांकडे बोट दाखविले जाते. तलाव परिसरात वन्यजीव व जलसंपदा विभागाने नौकाविहार करण्यास मनाई असल्याचे फलक लावले आहेत. असे केल्यास २०० रुपये दंड आकारणी करण्यात येईल असेही नमूद आहे. मात्र सर्रास हा गोरखधंदा सुरू असूनही अद्याप २०० रुपये दंड शासनाच्या तिजोरीत जमा झाला नाही.

 

Web Title: Ruleless Boating on Navegaonbandh reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.