रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच

By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:35:03+5:302014-09-08T00:35:03+5:30

शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले.

Rubella vaccination camp without permission | रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच

रूबेला लसीकरण शिबिर परवानगीविनाच

गोंदिया : शनिवारी (दि.६) शहरातील सिव्हील लाईन परिसरातील डॉ. चंपा सलाम यांच्या खासगी रूग्णालयात भंडाऱ्याच्या एका स्वयंसेवी संस्थेने रूबेला लसीकरण शिबीर आयोजित केले. सदर शिबिरात १६० युवतींना रूबेलाच्या लसी लावण्यात आल्या. हे शिबिर आरोग्य विभागाच्या परवानगीविनाच घेण्यात आले व महागडी लस अत्यल्प दरात उपलब्ध करवून दिल्याने शहरात तर्कवितर्क लावले जात आहेत.
केवळ १०० रूपयांत रूबेलाची लस उपलब्ध करवून देण्याबाबत शहराच्या काही भागात घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. नाव नोंदविण्याच्या नावावर त्यांच्याकडून २०-२० रूपये वसूल करण्यात आले. अशाप्रकारे अनेक युवतींकडून भंडाऱ्याच्या विमलानंद बहुउद्देशिय शिक्षण संस्थेशी जुळलेल्या लोकांनी रूपये वसूल केले. ज्यांनी लस लावली त्यांच्याकडून १००-१०० रूपये वसूल करण्यात आले. या शिबिरात किती युवतींनी लसीकरण करून घेतले, याबाबत काहीही सांगण्यास राहुल माकोडे नामक कर्मचाऱ्याने नकार दिला. मात्र ज्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते, त्यांच्यानुसार १६० युवतींना सदर लस लावण्यात आली. विशेष म्हणजे बाजारात रूबेलाची लस ३०० ते ४०० रूपयांपर्यंत उपलब्ध असते. ही लस महागडी असल्याने औषध विक्रेतेसुद्धा तिला विक्रीसाठी ठेवण्यास इच्छुक नाहीत. मग ज्या संस्थेचे लोक केवळ १०० रूपयात उपलब्ध करून देतात ते ही लस कोठून आणतात, हा प्रश्न उद्भवतो.
कोणतेही आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी आरोग्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. सदर शिबिर गोंदिया शहरात असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेणे आवश्यक होते. चौकशी केल्यावर अस्थायी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप्रिया झॉ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल व डॉ. विनोद वाघमारे यांनी सदर शिबिर घेण्याबाबत कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर शिबिर परवानगीविनाच आयोजित करण्यात आल्याचे सिद्ध होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rubella vaccination camp without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.