तलाव व बोडी खोलीकरणात घोळ
By Admin | Updated: July 3, 2015 02:16 IST2015-07-03T02:16:51+5:302015-07-03T02:16:51+5:30
तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर...

तलाव व बोडी खोलीकरणात घोळ
आमगाव : तालुक्यातील जवरी येथे शासन निधीअंतर्गत सिंचनाच्या कामांना प्राधान्य देत गावातील २० लाखांच्या निधीतून तलाव खोलीकरण तर बोळी खोलीकरणावर ११ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु या दोन्ही कामात मोठ्या प्रमाणात घोळ करून अभियंता व कंत्राटदारांनी शासन निधीचा गैरवापर केला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आमगाव तालुक्यातील जवरी येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय तर शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळावी याकरिता शासन योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाची कामे मंजूर करण्यात आले. या कामांची देखरेख लघू सिंचन उपविभागीय कार्यालय यांच्याकडे आहे. तर कामावरील निधीचा प्रारुप ठरवून देण्यात आले आहे. गावातील तलावांचे खोलीकरण करण्याच्या कामांकरिता २० लाखांचे नियोजन तर बोळी खोलीकरण व पाणीघाट बांधकाम करण्याकरिता ११ लाखांच्या निधीचे नियोजन शासनातर्फे मंजूर करण्यात आले. परंतु सदर दोन्ही कामांवरील निधीचा बट्ट्याबोळ करण्याची कामे अभियंता व कंत्राटदारांनी केल्याचे पुढे आले आहे.
तलाव व बोळी खोलीकरण व पाणघाट बांधकामातील अनियमितता कामावरील प्रत्यक्षदर्शनानेच पुढे येते. तलाव व बोळी खोलीकरण नियमाप्रमाणे करण्यात आले नाही. खोलीकरणाची उंची दर्शवून मजुरांचा निधी व खोलीकरणाच्या दरावर डल्ला मारण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे.
सदर बोळी खोलीकरणात ठराविक उंचीवरील खोलीकरणातील घोळ पुढे करुन पाणघाट बांधकामात निकृष्ठ गौण खनिजांचा वापर करुन बांधकाम करण्यात आले आहे. पाणघाट बांधकामातील अनियमिततेमुळे पाणघाटावरील भेगा प्रत्यक्ष पाहणीत दिसून येत आहे. सदर बांधकामावरील मार्गदर्शक सूचना ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडून घेणे बंधनकारक आहे. परंतु लघू पाटबंधारे उपविभागातील अधिकारी व अभियंत्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नियंत्रण नसल्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी कामावरील दर्जा खालावून मर्जिप्रमाणे कामे पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली सिंचन सुविधा या घोळामुळे मागे पडली आहे.
सदर तलावाचे खोलीकरण, बोळीचे खोलीकरण व पाणघाट बांधकामाची चौकशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी व झालेला घोळ उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)