कक्ष तयार, मात्र करवसुली अधिकारीच नाही
By Admin | Updated: March 2, 2015 01:33 IST2015-03-02T01:33:06+5:302015-03-02T01:33:06+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली.

कक्ष तयार, मात्र करवसुली अधिकारीच नाही
गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार पाटील यांची नियुक्ती केली. कर वसुली अधिकारी रुजू होणार यामुळे नगरपरिषद कार्यालयात असलेले पक्षनेत्यांचे कक्ष त्यांच्यासाठी सज्ज करण्यात आले. मात्र महिनाभर लोटून गेला असूनही पाटील रूजू न झाल्याने कक्ष असून त्यासाठी अधिकारीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपरिषदेने कर वसुली अधिकारी मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे मागणी केली होती. कर वसुली अधिकारी मिळाल्यास नगरपरिषदेच्या डोक्यावर असलेले ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर कमी होणार अशी नगरपरिषद प्रशासनाची अपेक्षा होती. एवढेच नव्हे तर पाटील रूजू झाल्यावर मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी ते स्वत: एक पथक घेऊन तसेच दुसरे पथक तयार करून पाटील यांच्या मार्गदर्शनात वसुली मोहीम राबविण्याचे ठरविले होते.
त्यानुसार त्यांनी आमसभेत ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. करवसुलीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नायब तहसीलदार निलेश पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी तसे आदेश नगरपरिषदेला मिळाले.
आता करवसुली अधिकारी पाटील येणार, त्यामुळे त्यांना बसण्यासाठी जागा लागेलच. अशात नगरपरिषद कार्यालयातील पूर्वी पक्षनेत्यांसाठी असलेले कक्ष करवसुली अधिकाऱ्यांसाठी आरक्षीत करून सज्ज करण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिना लोटून गेला तरिही पाटील रूजू झालेच नाहीत. अशात त्यांच्यासाठी आरक्षीत करून ठेवलेले कक्ष तसेच बंद पडून आहे. एकीकडे ज्यांना वेगळे कक्ष नाही ते वेगळे कक्ष लाभावे यासाठी धडपडत असतात. येथे मात्र उलटाच कारभार दिसून येत आहे. पाटील साहेबांसाठी कक्ष तयार असूनही ते रूजू होत नसल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले कक्ष बंद पडून आहे. तर पालिकेतील कर्मचारी पाटील कधी रूजू होणार याची वाट बघत आहेत. मात्र त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या कक्षावर करवसुली अधिकाऱ्यांचे कक्ष अशी पट्टी चिकटविण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)
एकच पथक करीत आहे वसुली
३१ जानेवारी रोजी पाटील यांची करवसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषदेला मिळाले. त्यानुसार पाटील २ फेब्रुवारी रोजी पदभार घेणार व त्यानंतर दोन कर वसुली पथक तयार करून वसुली केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी मोरे यांनी लोकमतला सांगीतले होते. मात्र पाटी अद्याप रूजू झालेले नाही. परिणामी एकच वसुली पथक शहरात कर वसुलीची मोहीम राबवित आहेत. दोन पथकांद्वारे मोहीम राबविल्यास कमी कालावधीत जास्तीत जास्त थकबाकीदारांपर्यंत पोहचता आले असता असे मुख्याधिकाऱ्यांचे नियोजन होते. मात्र पाटील न आल्याने त्यांचे हे नियोजन फिस्टकले. परिणामी एकच पथक कार्यरत आहे.