लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद
By Admin | Updated: April 27, 2016 02:04 IST2016-04-27T02:04:48+5:302016-04-27T02:04:48+5:30
तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी

लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद
शिक्षकावर कारवाईच नाही : दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश
आमगाव : तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकावर जिल्हा परिषद प्रशासन मात्र चांगलेच मेहरबान दिसत आहे. घटनेला २५ दिवस लोटूनही त्या शिक्षकावव कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाची संशयास्पद भूमिका असल्याचे मत पालकांमध्ये उमटत आहेत. याशिवाय दुसऱ्या आरोपीला अद्यापही अटक करण्यात पोलिस विभागाला यश आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैगिंक अत्याचार करण्याचे कृत्य केले. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात शिक्षकांनीच केलेला हा विकृत मानसिकतेचा प्रकार सर्वांसाठी धक्कादायक ठरला. सुरूवातीला हा अत्याचार सहन करणाऱ्या विद्यार्थिनींनी अखेर शिक्षकांची वाढती मनोवृत्ती पाहता हा प्रकार पालकांना सांगितला.
पालक व नागरिकांनी शाळेवर धाव घेऊन हे कृत्य उघड केले. संतापलेल्या नागरिक व पालकांनी अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
गेल्या २ एप्रिलला शिक्षकाला अटक करण्यात आली. आरोपी शिक्षकाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. याचदरम्यान दुसऱ्या प्रकरणाला वर्तमानपत्राच्या माध्यमाने वाचा फुटली. या प्रकरणात लैगिंक अत्याचार करणारा दुसरा आरोपी गजाआड झाला. परंतु गुन्हा नोंद होताच आरोपी शिक्षक पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. अद्यापही त्या आरोपी शिक्षकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे नागरिक व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सदर प्रकरणातील अटक असलेल्या शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु २५ दिवस लोटूनही जिल्हा परिषद प्रशासनाने त्या शिक्षकावर कोणतीच कारवाई केली नाही. उलट चौकशीच्या नावावर वेळ घालविण्यात येत असल्याने पालकांमध्ये व नागरिकांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या व प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
आरोपींना पाठबळ कुणाचे?
मागील २५ दिवसांपुर्वी उघड झालेल्या विद्यार्थिनींच्या लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपींवर योग्य कारवाई झाली नसतानाच तर दुसराही शिक्षक आरोपी पोलिसांना गवसला नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. या आरोपींना पाठबळ घालणारे कोण? अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.