निधीअभावी रखडले शंभुटोला रस्त्याचे काम
By Admin | Updated: March 19, 2015 01:11 IST2015-03-19T01:11:26+5:302015-03-19T01:11:26+5:30
शंभुटोला ते ननसरी व पुढे जाणाऱ्या असा एकूण १३ किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झाला. या कामाकरिता जवळपास ६ कोटी रुपये मंजूर झाले.

निधीअभावी रखडले शंभुटोला रस्त्याचे काम
आमगाव : शंभुटोला ते ननसरी व पुढे जाणाऱ्या असा एकूण १३ किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झाला. या कामाकरिता जवळपास ६ कोटी रुपये मंजूर झाले. मात्र सध्या निधी नसल्यामुळे शंभुटोला रस्ता रखडला. शासनाने निधीकरीता विलंब लावल्याने प्रवाशांना मात्र मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत.
शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरी व पुढे मुंडीपार या १३ किमीच्या मार्गावर अनेक वर्षापासून प्रवाशांना यातना सहन कराव्या लागत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभाग गोंदिया यांच्याकडे निधीची कमतरता आहे. त्यामुळे माजी केंद्रीय उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. मात्र या मार्गाला केंद्राकडून मिळालेला निधी राज्य शासनाने न दिल्यामुळे कंत्राटदारांनी कामाची गती मंदावली आहे. फक्त पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे काम बंद आहे.
या मार्गावरील नाली बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत. मार्गावर गिट्टी मोठ्या प्रमाणात पडली आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीचा प्रवास या मार्गावर होऊ शकत नाही. लांब फेरा होऊन आमगावला अनेक नागरिक विद्यार्थी येतात. चार किमीकरिता दहा किमी फेरा मारून या मार्गाचा प्रवास अनेकांचा सुरू आहे. निधी राज्य शासनानी त्वरीत देणे गरजेचे आहे. तब्बल तीन महिन्यापासून हे काम रखडले आहे. (तालुका प्रतिनिधी)