आजारी ‘द्वारका’ मृत्युशय्येच्या वाटेवर
By Admin | Updated: September 10, 2015 02:19 IST2015-09-10T02:17:38+5:302015-09-10T02:19:47+5:30
तिच्याकडे पाहताच वाटायला लागते, दोन वर्षापूर्वी सुंदर व ठणठणीत दिसणारी द्वारका आता अगदी हाडांचा सांगाडा बनली आहे.

आजारी ‘द्वारका’ मृत्युशय्येच्या वाटेवर
सागर काटेखाये साखरीटोला
तिच्याकडे पाहताच वाटायला लागते, दोन वर्षापूर्वी सुंदर व ठणठणीत दिसणारी द्वारका आता अगदी हाडांचा सांगाडा बनली आहे. होय, अगदी हाडांचा सापडाच. विश्वास बसणार नाही, पण खरोखरच ती अगदी मृत्यूच्या वाटेवर उभी आहे. द्वारकाची ही अवस्था एका भयंकर आजाराने केली आहे. सोबतच दारिद्र्याचे जगणे तिच्या वाट्याला आले आहे.
ही घटना आहे एका छोट्याशा गावातील द्वारकाची. देवरी तालुक्यातील साखरीटोल्यापासून १० किमी अंतरावरील ओवारा येथील द्वारका घनश्याम मौजे या तरूणीची. ती एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. मागील दोन वर्षांत तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला विशिष्ट प्रकारची सूज आली व ती सारखी वाढत आहे. पाहता-पाहता रोगामुळे तिचे अन्न पाणी सुटले. सुंदर दिसणारी व ठणठणीत शरीरयष्टीची द्वारका शरीराने कमकुवत होऊन केवळ हाडे मात्र उरली आहेत.
या रोगामुळे ती हळूहळू मृत्यूच्या वाटेवर जात आहे. मात्र उपचार करण्यासाठी एक रुपयासुद्धा हाती नाही. गरिबी तर पाचवीला पूजलेलीच. वडील तीन वर्षांपूर्वीच वारले. आई केशर मौजे मजुरी करून पोट भरते. जमीन नाही, भूमिहीन आहे. चार मुली व एक मुलगा असून मोलमजुरीच्या भरवशावर केशर संसाराचा गाडा हाकत आहे.
द्वारका बारावीपर्यंत शिकली. रिकाम्या वेळात आईला हातभार म्हणून तीसुध्दा मातीच्या कामाला जात होती. परंतु आजारामुळे आता ती पडून आहे. लहान बहिणी व भाऊ जि.प.च्या शाळेत शिक्षण घेत आहेत. हातात पैसा नसल्याने साध्या डॉक्टरांकडे दाखविले, मात्र रोगाचे निदान झाले नाही. औषधोपचार करू शकत नाही. मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर पैसे खूप लागतात. त्यामुळे तरुण मुलगी मृत्यूशय्येच्या वाटेवर असूनही आई काहीही करू शकत नाही, अशी केविलवाणी परिस्थिती झाली आहे.
म्हणतात ना ज्याच्याजवळ धन असते तर खाणारे नसतात व धन नसले तर खाणारेच खाणारे असतात, तर हे काही खोटे नाही. महागाईच्या काळात गरिबीच्या तडाख्यात औषधोपचार कोठून करणार? असा प्रश्न द्वारकाच्या आईला पडला आहे. जगात दु:खाला पारावार नाही. ऐनकेन कारणाने माणूस दु:खी असतो.
पण असेही दु:ख माणसाच्या वाट्याला येवू नये म्हणजे झाले. जन्म आहे तर मृत्यूही आहेच. मात्र ऐन तारुण्यात होणारा मृत्यू हृदयाला चटके लावून जातो. दारिद्र्याचे जीवन जगणाऱ्या माणसाला हे सहन केल्याशिवाय पर्याय नसते.
पण, म्हणतात ना अंधारातूनच प्रकाशाची किरणे दिसतात, झाले तसेच! सामाजिक कार्यकर्त्या व माजी जि.प. समाजकल्याण सभापती सविता पुराम दोन दिवसांपूर्वी ओवारा येथे पंतप्रधान विमा योजनेच्या कामासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना द्वारकाच्या आजाराविषयी माहिती मिळाली व लगेच त्यांनी सरपंच कमल येरणे यांना सोबत घेऊन द्वारकाचे घर गाठले.
तिची अवस्था पाहून तिला उपचाराकरिता केटीएच गोंदियाला नेण्याची तयारी दर्शविली. आ. संजय पुराम यांना सांगून मुख्यमंत्री निधीतून मदत मिळवून देण्याची हमी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली. त्यामुळे सविता पुराम यांच्या रुपाने मदतीचे हात द्वारकापर्यंत पोहचले असले तरी सामाजिक संस्थांनी द्वारकाच्या उपचाराकरिता पुढे यावे, असे वाटते.