रस्ता रोखून दर्शविला विरोध
By Admin | Updated: May 15, 2015 00:47 IST2015-05-15T00:47:23+5:302015-05-15T00:47:23+5:30
शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

रस्ता रोखून दर्शविला विरोध
देवरी/रावणवाडी : शासनाच्या भू-संपादन कायद्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता रस्त्यावर उतरले असून यातूनच गुरूवारी (दि.१४) राष्ट्रव्यापी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या राष्ट्रव्यापी आंदोलनांतर्गत गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे मुख्य मार्गावर तसेच देवरी तालुक्यातील चिचगड मार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे रावणवाडी येथे भाकपच्या कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली.
भू-संपादन कायदा २०१३ मध्ये संशोधन करून सत्तेत आलेली भाजप शासन विदेशी भांडवलदार, कारखानदार, भू-माफिया व बिल्डर्सच्या हितास्तव नवीन भू संपादन कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर नव्याने तयार करण्यात येणारा कायदा शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण जनतेसाठी घातक असल्याचे कारण पुढे करीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचा विरोध करीत आहे. आपला विरोध दर्शविण्यासाठी भाकपने राष्ट्रव्यापी आंदोलन झेडले असून त्यांतर्गत गुरूवारी (दि.१४) जिल्ह्यातील मुख्य मार्गांवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनांतर्गत रावणवाडी येथे मुख्य मार्गावर भाकप कार्यकर्त्यांनी दुपारी १.३० वाजता रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे २० मिनीटे अवरूद्ध झाली होती. तर आंदोलनाला बघता पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान मंडळ अधिकारी अशोक कोरे यांना भू संपादन अध्यादेश रद्द करणे तसेच अदानी पावर प्रोजेक्ट, बिरसी एअरपोर्ट व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कित्येक कित्येक शेतकरी प्रभावीत झालेत. त्यांचे पूनर्वसन करून रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी असलेले निवेदन देण्यात आले. पश्चात सुमारे ५०-६० कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव करूणा गणवीर, तालूका सहसचिव प्रल्हाद उके, छन्नू रामटेके, क्रांती गणवीर, ताराचंद डोमळे, जितेंद्र गजभिये, सत्यपाल उके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर देवरी येथे देवरी शाखेने मोर्चा काढून चिचगड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव शेखर कनोजिया यांनी केले. आंदोलनांतर्गत भू-संपादन कायद्याविरोधात नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिचगड मार्गावरील वाहतूक काही काळ अवरूद्ध झाली होती. दरम्यान भू-संपादन कायदा रद्द करणे, वनहक्क जमीन अतिक्रमण करणाऱ्यांना पट्टे द्या, रोहयो अंतर्गत कामात प्रती कुटूंब दोन व्यक्तींना कामे द्या, २०० दिवस कामे देऊन ३०० रूपये मजूरी द्या आदि मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सुयर्वंशी यांना देण्यात आले.