गोंदियात ठिगळ लावून रस्त्यांची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 01:08 IST2017-04-11T01:08:01+5:302017-04-11T01:08:01+5:30
अवघ्या शहरातीलच रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यांच्या या अवस्थेमुळे शहरवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत.

गोंदियात ठिगळ लावून रस्त्यांची डागडुजी
बाजारातील रस्ते : थातूरमातूर कामावर पैशांचा अपव्यय
गोंदिया : अवघ्या शहरातीलच रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यांच्या या अवस्थेमुळे शहरवासीय चांगलेच त्रस्त झाले आहेत. अशात मात्र बाजारातील रस्त्यांना ठिगळ लावून डागडूजी सुरू आहे. तेही काम थातूरमातूर होत असून काही दिवसांतच तेही उखडणार यात शंका नाही. अशात मात्र डागडुजीच्या नावावर पैशांचा अपव्यय नगर परिषदेकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.
अवघ्या शहरालाच रस्त्यांचे ग्रहण लागले आहे. बाजार भाग असो की रहिवासी भाग, संपूर्ण शहरातीलच रस्ते उखडलेले असून त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरातील रस्त्यांच्या या अवस्थेमुळे लागणाऱ्या दचक्यांनी शहरवासीयांची ‘हड्डी-पसली’ एक झाली असल्याचेही बोलले जात आहे. मात्र रस्त्यांच्या या समस्येवर तोडगा काही दिसून येत नाही.
अशात सध्या बाजार भागातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जात आहे. येथे डागडुजी म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांवर ठिगळ लावले जात आहे. खड्ड्यांवर डांबरी मसाला टाकला जात असून त्यावर रोलरही फिरविलेला नसल्याचे दिसून येत आहे. नेहरू चौक ते दुर्गा चौक व गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक मार्गावर हे काम सुरू आहे. विशेष म्हणजे बाजारातील नागरिकांनी नगराध्यक्षांकडे रस्त्यांची समस्या मांडली त्यावर नगराध्यक्षांनी हे रस्ता दुरूस्तीचे काम करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
एकीकडे रस्त्यांच्या विषयाला घेऊन स्थायी तोडगा काढला जात नाही. त्यात दुरूस्तीच्या नावावर फक्त ठिगळ लावले जात असून तेही थातूरमातूर काम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे ठिगळ काही जास्त दिवस टिकणार नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. अशात या कामावर खर्च केलेला पैसा वाया तर जाणार नाही ना, अशी स्थिथी आहे. (शहर प्रतिनिधी)
सिमेंट रस्त्याचे दिवास्वप्न
याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात हे काम केले जात आहे. बाजारातील या रस्त्यांसाठी सिमेंट रस्ता प्रस्तावीत आहे. मात्र त्यापूर्वी बाजारातील नागरिकांची सोय व्हावी या उद्देशातून हे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मार्केट परिसरात सिमेंट रस्ते तयार करण्यापूर्वी अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे हे काम एवढ्यात होणे शक्य नाही. शहरातील आणखीही रस्ते याहीपेक्षा जास्त खराब झाले आहेत. त्यांचीही अशाचप्रकारे डागडुजी करण्याचीही मागणी होत आहे.