सडक-अर्जुनी तालुका एमआयडीसीपासून वंचित
By Admin | Updated: January 4, 2017 00:55 IST2017-01-04T00:55:49+5:302017-01-04T00:55:49+5:30
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे.

सडक-अर्जुनी तालुका एमआयडीसीपासून वंचित
सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव या सर्वच तालुक्यांत एमआयडीसी करिता शासनाने जागा उपलब्ध करुन तेथे काही उद्योगही सुरू आहेत. मात्र सडक-अर्जुनी तालुका मागील २० ते २५ वर्षापासून एमआयडीसीपासून वंचीत आहे. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
सडक-अर्जुनी तालुक्याची निर्मिती सुमारे २० ते १५ वर्षापुर्वी झाली. मात्र अजूनही या तालुक्याला शासनाने एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. आज तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व रेल्वेमार्ग असूनही या तालुक्याला शासनाकडून वंचित ठेवण्यात आले आहे.
तालुक्यात २० वर्षापुर्वी एमआयडीसी उभारली गेली असली तर तालुक्यासह जिल्हा तसेच बाहेरील उद्योजकांनाही या जागेचा फायदा झाला असता. शिवाय यातून तालुक्यातील सुशीक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले असते. मात्र आज या तालुक्यातील बेरोजगार पोटाची खळगी भरण्याकरिता घरदार सोडून बाहेरगावी धाव घेत आहेत. तर कित्येकांना काम मिळत नसल्याने निराश होऊन घरी परतावे लागते. करिता संबंधित अधिकाऱ्यांनी सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दयावी व तेथे काही उद्योग सुरू करण्याची गरज आहे. यासाठी श्रीराम नगरच्या बाजूला एमआयडीसीची जागा शासनाने उपलब्ध करुन दयावी अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे, हरिष कोहळे, गायत्री इरले यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. (वार्ताहर)