वीज पुरवठ्याअभावी धानपिक धोक्यात
By Admin | Updated: March 6, 2015 01:38 IST2015-03-06T01:38:09+5:302015-03-06T01:38:09+5:30
विद्युत वितरण कंपनी देवरी उपविभागाअंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोसंबी, कोल्हारगाव, कोहलीटोला, बानटोला, बकी, मेंढकी, मनेरी आदी गावात मागील काही ...

वीज पुरवठ्याअभावी धानपिक धोक्यात
चिखली : विद्युत वितरण कंपनी देवरी उपविभागाअंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोसंबी, कोल्हारगाव, कोहलीटोला, बानटोला, बकी, मेंढकी, मनेरी आदी गावात मागील काही दिवसांपासून अनियमित विज पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याअभावी उन्हाळी धान पिकांना धोका निर्माण झाला आहे.
अत्यंत कमी दाबाच्या वीज पुरवठ्याअभावी नळ योजनेच्या मोटारी सुरू होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू झाली आहे. कमीजास्त दाबामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे निकामी झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
अनियमित विज पुरवठ्याला टाळून नियमित वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी सदर गावातील शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले, मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पुन्हा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेवून जि.प. सदस्य जागेश्वर धनभाते, वसंता गहाणे, माधव तरोणे, ईश्वर गहाणे, गुलाब कापगते यांनी सडक-अर्जुनी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र अधिकाऱ्यांनीही असमर्थता व्यक्त केली. (वार्ताहर)