जोरदार पावसाच्या आगमनाने वरथेंबी पिकांना नवजीवन
By Admin | Updated: September 19, 2015 03:03 IST2015-09-19T03:03:21+5:302015-09-19T03:03:21+5:30
दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले.

जोरदार पावसाच्या आगमनाने वरथेंबी पिकांना नवजीवन
शेतकऱ्यांची आशा बळावली : हातून जाणारे पीक काही प्रमाणात मिळणार
आमगाव : दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या वरथेंबी जमिनीत हलक्या धानाची स्थिती गंभीर होती. बुधवारी झालेल्या पाऊस वरथेंबी जमिनीसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे हातातून जात असलेल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण तालुक्यात वरथेंबी शेतजमिनीतील धान पीक धोक्यात आले होते. पाणी नसल्याने धानाला वाचविणार कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. जे होते ते शेतात लावून पाण्याची आस शेतकऱ्यांना होती. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यातच हलक्या धानाची रोपे वाळण्यास सुरूवात झाली होती. वाळलेल्या रोपट्यांना वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी आटापिटा सुरू केला होता. लांब अंतरावरून पाईपद्वारे धानपिकांना पाणी देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हव्या त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.
कडक उन्हामुळे शेतकरी हैरान झाले होते. मात्र १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे वरथेंबी पिकांना जीवनदान मिळाले. हातातून निघून जात असलेले धानाचे पीक काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार, अशी आशा आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
ते तडी-बोडी मागील पंधरा दिवसांपूर्वी खाली होते, ते काही प्रमाणात भरल्याने आता वरथेंबी शेतीत उभे असलेल्या हलक्या धानांना आता जीवदान मिळणार, अशी परिस्थिती पावसाच्या आगमनाने निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)