आंबेडकरांचे विचार पोहोचवा

By Admin | Updated: May 3, 2016 02:22 IST2016-05-03T02:22:05+5:302016-05-03T02:22:05+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी एक आदर्श संविधान लिहिले. या संविधानात देशाला एकसंघ

Reveal Ambedkar's thoughts | आंबेडकरांचे विचार पोहोचवा

आंबेडकरांचे विचार पोहोचवा

गोंदिया : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी एक आदर्श संविधान लिहिले. या संविधानात देशाला एकसंघ ठेवण्याची शक्ती आहे. हे संविधान सर्वसामान्यांना कळले पाहिजे व ते घराघरांपर्यंत पोहोचल्यास डॉ. आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जाण्यास मदत होईल, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय विभागाच्या दूत समतेचा-जागर महामानवाचा या उपक्रमांतर्गत २९ एप्रिल रोजी अर्जुनी-मोरगाव येथे ‘राजगृहाची निळी स्पंदने’ या बोधी फाऊंडेशन नागपूर प्रस्तुत मेगा म्युझिकल शोचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय पुराम, माजी आमदार दयाराम कापगते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, शारदा बडोले, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, नगर पंचायत उपाध्यक्ष विजय कापगते, सडक-अर्जुनी सभापती कविता रंगारी, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, कमल पाऊलझगडे, तेजुकला गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी, तालुका खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, वीरेंद्र अंजनकर, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, उमाकांत ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, सामाजिक न्यायमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम लंडन येथे सन १९२० ते २२ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना वास्तव्य केलेले घर राज्य सरकारने खरेदी करून त्याचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले. इंदू मिलची जागा ताब्यात घेऊन तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येईल. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करताना नागपूर येथे सव्वा लाख विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दलित, शोषित, वंचित, भटक्या विमुक्त जाती, जमाती व बहुजन या तळागाळातील ८० टक्के लोकांचे प्रश्न सोडविण्याला आपली प्राथमिकता असल्याचे सांगून बडोले पुढे म्हणाले, राज्याच्या कानाकोपऱ्यात डॉ. आंबेडकरांचे विचार पोहोचविण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा मागोवा घेण्यासाठी दूत समतेचा जागर-महामानवाचा हा उपक्रम त्यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या महामानवाला अभिवादन करण्यासाठी राबविण्यात येत असल्याचे बडोले यांनी सांगितले.
अनेक चांगले निर्णय एका वर्षाच्या काळात घेतल्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचा गौरवपूर्ण उल्लेख बडोले यांनी यावेळी केला. बोधी फाऊंडेशन नागपूर यांनी सादर केलेल्या राजगृहाची निधी स्पंदने या मेगा म्युझिकल शोमधून डॉ.आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. बडोदयाचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांना शिक्षणासाठी केलेली मदत, गांधीजीसोबत पुणे करार, गोलमेज परिषद, नदीखोरे प्रकल्पाची मांडलेली संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हिराकुंड धरणाचे प्रारूप, रिझर्व्ह बँकेची स्थापनाही डॉ. आंबेडकरांमुळेच झाली. बाबासाहेबांनी भारतीय संविधानात ३४० हे पहिले कलम इतर मागासवर्गीय घटकांसाठी, ३४१ हे अनुसूचित जातीसाठी तर ३४२ कलम हे आदिवासी बांधवांकरिता लिहिल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख यांना दिसून आले. पंजाबराव देशमुख तर डॉ. आंबेडकरांना ओबीसी बांधवांसाठी संविधानात काहीतरी तरतूद करावी, हे सांगण्याकरिता आले असता त्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांनी सर्वप्रथम ३४० वी कलम ओबीसी बांधवांसाठी लिहिल्याचे दिसून आल्याने पंजाबराव देशमुखसुद्धा भारावून गेल्याचा प्रसंग दाखिवण्यात आला.
भारतीय संविधान लिहिताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले महत्वपूर्ण योगदान, मनुस्मृती दहन, प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रातून डॉ. आंबेडकरांचे समता, बंधुत्व व न्याय यावर केलेले लिखाण समाजाच्या प्रबोधनासाठी त्याकाळी उपयुक्त ठरले, हे नाट्यप्रसंगातून दाखिवण्यात आले. बौद्ध धम्म दीक्षाप्रसंग, छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना शिक्षणासाठी केलेली मदत, त्यांच्या बुद्धिमत्तेचे शाहू महाराजांनी केलेले कौतुक आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा डॉ. आंबेडकरांवर असलेला प्रभाव नाट्यप्रसंगातून दाखिवण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या विषयांवरदेखील नाट्यकृतीतून प्रकाश टाकण्यात आला.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते बोधी फाऊंडेशनचे ललीत खोब्रागडे व अर्जना खोब्रागडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राजगृहाची निळी स्पंदने या मेगा म्युझिकल शोमध्ये सादर करण्यात आलेली गीते, नाट्यप्रसंग, नृत्य व निवेदनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपटच उलगडून दाखविण्यात आले. कार्यक्रमाला अर्जुनी-मोरगाव तसेच परिसरातील गावातील नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

बाल भीमास वडिलांचे मार्गदर्शन
४बडोले म्हणाले, बालपणी अस्पृश्यतेचे चटके शाळेत शिक्षण घेत असतानाच भोगले. त्यांना शिक्षक वर्गात इतर विद्यार्थ्यांसोबत बसून शिक्षण घेण्यास मनाई करीत होते. आईसोबत बालपणी भीमराव दुकानात लुगडे खरेदीसाठी गेले असता भटजीच्या सांगण्यानुसार अस्पृशाची सावली दुकानात पडल्याने दुकान बाटविल्याचा हा प्रसंग भीमरावांनी सुभेदार रामजींना सांगितला. यानंतर सुभेदार रामजी बाल भीमरावांना उपदेश देताना म्हणतात, भीमा, अस्पृश्यदेखील माणसेच असतात. निसर्गाने कधीच भेदभाव केला नाही. भीमा तुही भेदाभेद करु नकोस. सर्वांना सोबत घेऊन चल. यातच मानवाचे भले आहे. मानवतेसाठीच तुला लढायचे आहे, असा सल्लाही रामजी सुभेदारांनी बाल भीमरावाला याप्रसंगातून दिला.

Web Title: Reveal Ambedkar's thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.