निराधारांना पाठवले आल्यापावली परत
By Admin | Updated: November 13, 2015 01:49 IST2015-11-13T01:49:28+5:302015-11-13T01:49:28+5:30
शेंङा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे देना बँकेची शाखा आहे. या शाखेत निराधारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या वृद्धापकाळ योजनेच्या पैशाचे वाटप केले जाते.

निराधारांना पाठवले आल्यापावली परत
दिवाळी अंधारात : शेंडा येथील देना बँकेतील प्रकार
शेंङा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे देना बँकेची शाखा आहे. या शाखेत निराधारांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या वृद्धापकाळ योजनेच्या पैशाचे वाटप केले जाते. परंतु ऐन दिवाळीसारख्या सणानिमित्त पैसा प्राप्त झाला नसल्याचे कारण पुढे करून त्यांना आल्यापावली परत पाठविण्यात आले. त्यामुळे निराधारांची दिवाळी अंधारातच गेल्याची ओरड आहे.
सडक-अर्जुनी येथील को-आॅपरेटिव्ह बँकेतील निराश्रित खातेदारांना दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले. त्यामुळे आपल्यालाही पैसे मिळतील, या आशेने शेंडा येथील देना बँकेसमोर ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बँक उघडताच उपभोक्त्यांनी गर्दी केली. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुमचे पैसे आलेच नाही, असे सांगताच त्यांची तारांबळ उडाली. आरडाओरड सुरू होवून आल्यापावली त्यांना परत जावे लागले. काहींनी बँक कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले.
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निराधारांचे दोन महिन्यांचे वेतन तहसील कार्यालयाकडून बँकेला पाठविण्यात आले. को-आॅपरेटिव्ह बँक सडक-अर्जुनी शाखेने ते पैसे वाटपही केले. परंतु देना बँकेने पैसे आलेच नाही, त्यामुळे तुम्ही परत जा, असे सांगताच निराश्रितांवर दिवाळीसारख्या सणाचे विरजन पडले.
या गावातील देना बँकेची शाखा आठवड्यातून फक्त दोनच दिवस उघडते. बँक उघडण्याची वेळ मात्र निश्चित नसल्याने कधी २ वाजता, कधी ३ वाजता किंवा कधी ४ वाजता उघडते. त्यामुळे नियमित ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठांचे या शाखेकडे लक्ष नसल्याने काम होईलच, याची हमी नाही. या गावची शाखा बँक कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीने चालते. त्यामुळे ‘हम करे सो कायदा’ असा प्रकार सुरू आहे.
सदर बँकेच्या कार्यशैलीची व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी करण्याची मागणी आहे.
तरी वरिष्ठांनी जातीने लक्ष पुरवून खातेदारांवर अथवा निराश्रितांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. (वार्ताहर)