आरक्षणामुळे दिग्गजांना झटका
By Admin | Updated: May 8, 2015 00:58 IST2015-05-08T00:58:59+5:302015-05-08T00:58:59+5:30
आमदार-खासदाराची जागा एसटी राखीव झाल्याने लायकी असूनही आमदार किंवा खासदारपदाचे दार बंद असल्याने अनेकांचा हिरमोड आधीच झाला आहे.

आरक्षणामुळे दिग्गजांना झटका
विजय मानकर सालेकसा
आमदार-खासदाराची जागा एसटी राखीव झाल्याने लायकी असूनही आमदार किंवा खासदारपदाचे दार बंद असल्याने अनेकांचा हिरमोड आधीच झाला आहे. आता कमीत कमी जि.प. सदस्य बनून पदाधिकारी बनावे, अशी इच्छा बाळगणारे सालेकसा तालुक्यातील दिग्गज राजकारणी सध्या जि.प.च्या दोन जागा एसटी राखीव झाल्याने अडचणीत आले आहेत. त्यांचे जि.प. सदस्य बनण्याचेही स्वप्न भंग झाले आहे.
सालेकसा तालुक्यात गैरआदिवासी लोकांची संख्या ९५ टक्क्यांच्या वर असून सर्व साधारणसाठी खुल्या असलेल्या जागा रद्द करुन अनुसूचित जमातीसाठी राखीव का करण्यात आले, म्हणून अनेक भावी उमेदवार आक्षेप घेण्याच्या पवित्र्यात आले आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेत एकूण ५३ सदस्यांपैकी सालेकसा तालुक्याच्या वाट्याला एकून चार जि.प. सदस्य संख्या लाभली आहे. यात झालिया, पिपरीया, आमगाव खुर्द आणि कारुटोला क्षेत्राचा समावेश आहे. या पुर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत झालिया पिपरीया आणि आमगाव खुर्द हे तिन्ही क्षेत्र सर्वसाधारण उमेदवारासाठी खुले झाले होते. तर कारुटोला क्षेत्राची जागा सर्वसाधारण महिलासाठी खुली होती. मात्र आता पुन्हा आरक्षण जाहिर झाले.
झालिया आणि आमगाव खुर्दची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने भाजपचे तालुका अध्यक्ष खेमराज लिल्हारे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे यांच्यासह अनेक दिग्गज अडचनित आले आहेत. त्यांचे स्वप्न भंग होताना दिसत आहेत. हे दोन्ही क्षेत्र एसटी आणि राखीव झाल्याने एकीकडे दिग्गज अडचणीत आले आहेत तर दुसरीकडे एसटीसाठी योग्य उमेदवाराचा तोटा प्रत्येक पक्षात दिसत आहे.
पिपरीया क्षेत्र एसटी बाहूल क्षेत्र असून सर्वसाधारण झाल्याने येथे उमेदवारिसाठी चुरस वाढलेली दिसत आहे. कारुटोला क्षेत्र ओबीसी महिला साठी राखीव झाली असून येथेही उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे. झालिया जि.प. क्षेत्रासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष खेमराज लिल्हारे, जेष्ठ कार्यकर्ते व माजी जि.प. सदस्य मेहतर दमाहे, जिल्हा महिला महामंत्री प्रतिभा परिहार हे प्रबळ दावेदार असून हेमराज सुलाखे, अरुण टेंभरे सुद्धा भाजपच्या उमेदवारीसाइी रांगेत होते.
काँग्रेस पक्षाकडून गजानन मोहारे, विद्यमान पं.स. सदस्य कैलाश अग्रवाल, घनश्याम नागपुरे प्रमुख उमेदवार होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून विद्यमान जि.प. सदस्या देवकी नागपूरे यांचे पती व तालुका अध्यक्ष लक्ष्मण नागपूरे प्रमुख दावेदार होते. परंतु या सगळ्यांचा स्वप्नभंग झाला आहे.
आमगाव खुर्द जि.प. क्षेत्रातून भाजपच्यावतीने विद्यमान जि.प. सदस्य कल्याणी कटरे यांचे पती व भाजपचे जिल्हा सचिव योगेश कटरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत बिसेन, माजी युवा मोर्चाध्यक्ष अजय वशिष्ठ,महामंत्री उमेदलाप जैतवार उमेदवारीच्या रांगेत होते. काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, प्रबळ दोवेदार होते. त्याच बरोबर इतर प्रमुख पदाधिकारी उमेदवारीच्या प्रयत्नात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा महासचिव बबलू कटरे, माजी महिला जिल्हा अध्यक्ष दुर्गा तिराले व इतर पदाधिकारी दावेदार होते. त्यामुळे वैचारीक उमेदवारीसाठी आपापली तलवार काढून ताव मारीत होते. परंतु दोन्ही जागा एसटी साठी राखीव झाल्याने आता या सर्वांचे स्वप्न भंग झाले असून या सर्वांचे स्वप्न भंग झाले असून या सर्वांनी आपआपल्या राजकीय तलवारी म्यान केल्या आहेत. झालिया क्षेत्रात लोधी समाजासह इतर ओबीसी प्रवर्गाचे लोग मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच आमगाव खुर्द क्षेतात लोधी पोवार कुणबीटोला व इतर ओबीसी सह कला प्रवर्गाचे हे लोक राहतात. दोन्ही क्षेत्रात अनुसूचित जमातीचे लोक अत्यल्प प्रमाणात असून राजकारणाचे त्याचे स्थान गौण आहे. त्यामुळे सर्वच पक्षाना टेंभा घेवून एसटी उमेदवार शोधावे लागणार एवढे नक्की. तर दिग्गज नेत्यांना पडद्यामागचेच राजकारण करावे लागणार आहे.