‘त्या’ आरोग्य सेवकावर कारवाईचा ठराव
By Admin | Updated: June 4, 2015 00:49 IST2015-06-04T00:49:21+5:302015-06-04T00:49:21+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी जि.प.सभागृहात पार पडली. यावेळी आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश ...

‘त्या’ आरोग्य सेवकावर कारवाईचा ठराव
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी जि.प.सभागृहात पार पडली. यावेळी आरोग्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले योजनेचे धनादेश व मुदत ठेवीचे प्रमाणपत्र गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित ठेवणाऱ्या आरोग्य सेवकावर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला.
आरोग्य आणि पंचायत विभागाच्या कारभारावर ही सभा गाजली. दुपारी १ वाजता सुरू झालेली सभा सायंकाळपर्यंत सुरू होती. यावेळी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी आरोग्य विभागाचा प्रश्न उपस्थित करून संबंधित आरोग्य सेवक लांजेवार यांच्या हलगर्जीपणामुळेच लाभार्थ्यांना सावित्रीबाई योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप केला. त्यावर जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर त्यांनी याबाबतचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आणि संबंधितांना लाभ देणार असल्याचे सांगितले.
आरोग्य व पशुसंवर्धन तसेच कृषी, पाणी पुरवठा या विभागांची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत आणि निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता कामांच्या ई-निविदा त्वरित प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभेला सीईओ गावडे उपस्थित नव्हते. मात्र उपाध्यक्ष मदन पटले, सभापती सविता पुराम, मोरेश्वर कटरे, प्रकाश गहाणे, कुसन घासले व इतर ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)