सरपंच पदांचे आरक्षण अखेर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:11+5:302021-02-05T07:50:11+5:30
गोंदिया : सरपंच पदाच्या आरक्षणाची असलेली उत्सुकता अखेर गुरुवारी (दि. २८) आरक्षण सोडत झाल्यावर शमली. गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण ...

सरपंच पदांचे आरक्षण अखेर जाहीर
गोंदिया : सरपंच पदाच्या आरक्षणाची असलेली उत्सुकता अखेर गुरुवारी (दि. २८) आरक्षण सोडत झाल्यावर शमली. गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मात्र सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांची खटाटोप वाढणार आहे. यामुळेच आता खुर्चीला घेऊन सेटिंग सुरू होणार आहे. जिल्ह्यात १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असल्याने आता या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.
जिल्ह्यातील १८९ ग्रामपचायतींचा कार्यकाळ संपल्याने त्यांची निवडणूक घेण्यात आली. यात ८ ग्रामपंचयतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याने उरलेल्या १८१ ग्रामपंचयतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात आली, तर १८ जानेवारी रोजी निकालही घोषित करण्यात आले आहे. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून वर्चस्वाला घेऊन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर न करण्यात आल्याने सर्वांच्या नजरा सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. अशात गुरुवारी (दि. २८) सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
सध्या तरी राजकीय पक्ष सदस्यांना घेऊन आपले वर्चस्व असल्याचे दाखवित आहेत. मात्र, सरपंच ज्यांचा, तोच खरा सत्ताधारी असणार, यामुळे आता आपला सरपंच बसविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू होणार आहे. यातूनच आता सेंटिंगला जोर येणार असून, आता सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
-------------------------------
कित्येक पॅनेल सदस्यांना घेऊन अंडरग्राऊंड
सरपंच ज्यांचा, तोच खरा सत्ताधारी असे बोलले जात असल्याने राजकीय पक्षांच्या नजरा आता सरपंचांच्या खुर्चीवर लागल्या आहेत. यातूनच सदस्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रकार सुरू होतात. असे झाल्यास त्या पॅनेलची सर्व मेहनतच पाण्यात जाते. असे प्रकार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून कित्येक पॅनेल आपल्या सदस्यांना घेऊन अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. आता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, निवडणुकीच्या दिवशीच ते अवतरणार आहेत.