भू्रण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा

By Admin | Updated: March 19, 2017 00:31 IST2017-03-19T00:31:06+5:302017-03-19T00:31:06+5:30

मुलींचे घटते प्रमाण ही चिंतनीय बाब असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहे.

Report the names of those who have killed | भू्रण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा

भू्रण हत्या करणाऱ्यांचे नाव कळवा

अभिमन्यू काळे : रोख २५ हजार रूपयांचे बक्षीस देण्याची घोषणा
गोंदिया : मुलींचे घटते प्रमाण ही चिंतनीय बाब असून हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहे. स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या जागरुक नागरिकास २५ हजार रु पये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.
स्त्री भ्रुण हत्या या विषयाला घेवून आयोजीत पत्रपरिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक चंद्रशेखर कलासागर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी काळे यांनी, एखादया सोनोग्राफी केंद्रावर लिंगनिदान होत असल्याची खात्रीलायक माहिती असल्यास बनावट केस करण्यासाठी गरोदर महिलांनी संमती दर्शविल्यास त्यांचेही नाव व ओळख गुप्त ठेवून जिल्हा प्रशासन गर्भिलंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार घेईल. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. तसेच गर्भिलंग निदान चाचणी करण्याचा व करणाऱ्यांचा सक्त विरोध करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गोंदिया जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण सन २०१३-१४ मध्ये ९५५, सन २०१४-१५ मध्ये ९२३, सन २०१५-१६ मध्ये ९५७ तर चालू वर्षी आतापर्यंत ९३८ असे आहे. जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाणात होणारी घसरण ही आपल्या सर्वांसाठी अतिशय गंभीर बाब आहे. या पाशर््वभूमीवर १५ मार्च ते १५ एप्रील या कालावधीत सर्व अल्ट्रा सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची विशेष तपासणी करण्यात येणार आहे.
याकरीता स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये आरोग्य, महसूल, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे असल्याचे डॉ.पातुरकर यांनी यावेळी सांगितले. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडलेल्या नुकत्याच घटनेवरुन लिंग निदान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अर्थात पी.सी.पी.एन.डी.टी. यासारखा कडक कायदा अस्तित्वात असतांना गर्भलिंग निदान होत असल्याच्या गंभीर घटनेची दखल राज्य शासनाने घेतली असल्याचे सांगीतले.
राज्यात सन २०११ च्या जनगणनेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ इतके आहे. सन २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत हे प्रमाण १३ टक्क्याने कमी झाले आहे. गोंदिया जिल्ह्याचे सध्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९३८ इतके आहे. राज्यातील ० ते ६ वर्ष या वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर प्रमाण सन २०१५ मध्ये ९०७ होते, तर २०१६ मध्ये ते ८९९ इतके झाले आहे, म्हणजे ८ अंकाने घटले आहे. माहिती खरी ठरल्यानंतरच ही रक्कम देण्यात येते. नागरिकांनी खरी व खात्रीशीर माहिती पुरवावी. विनाकारण सोनोग्राफी केंद्राची बदनामी होईल अथवा निष्पाप डॉक्टरला मनस्ताप होईल अशी माहिती पुरवू नये असेही त्यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)

- माहिती देणाऱ्यांचे नाव राहणार गुप्त
ज्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणी १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती नागरिक देवू शकतात. त्याचप्रमाणे संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल. गर्भंलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती किंवा सोनोग्राफी केंद्राबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रु पयांचे रोख बक्षीस देण्यात येईल. विशेष म्हणजे यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

Web Title: Report the names of those who have killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.