ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:32 IST2021-08-24T04:32:48+5:302021-08-24T04:32:48+5:30
देवरी : तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असताना शेवटच्या टोकावरील कडीकसा या गावात खंडित वीज पुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झाले ...

ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून द्या
देवरी : तालुका नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल असताना शेवटच्या टोकावरील कडीकसा या गावात खंडित वीज पुरवठ्यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. संतप्त गावकऱ्यांनी जास्त क्षमतेचे नवीन ट्रान्सफाॅर्मर तत्काळ बसविण्याची मागणी वीज मंडळाकडे केली आहे.
कडीकसा गाव १२०० लोकसंख्येचे असून, एकाच ट्रान्सफाॅर्मरवरून गावकऱ्यांना घरगुती व कृषिपंपांना वीज पुरवठा केला जात आहे. यामुळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होत असून, वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सोबतच सन २०१८पासून शेतीकरिता नवीन जोडणीचे प्रस्ताव शेतकऱ्यांनी दाखल केले असून, निधीअभावी अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतात बोअरवेल खोदूनही शेतकऱ्यांना वीज जोडणीअभावी पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. या विषयाला घेऊन वारंवार चिचगड येथील कनिष्ठ अभियंता कांबळे यांच्याकडे नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याची मागणी करण्यात आली. मात्र, ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. हा विषय गांभीर्याने हाताळून कडीकसा येथील ट्रान्सफाॅर्मर तत्काळ बदलण्याची मागणी गावकऱ्यांनी वीज मंडळाकडे केली आहे. यावर नवीन ट्रान्सफाॅर्मर व वीज जोडणी पूर्ण करण्याची मागणीही पूर्ण केली जाईल, असे आश्वासन वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी कडीकसा येथील शेतकरी यशवंत बागडेरिया, मोहन कोरेटी, दुर्गा कल्लो, सुखीराम वाघाडे, शंकर कल्लो, भागीराम कुमरे, गणेश कुमरे, सोहित कुंभरे, रंजित कासम, गन्ना गुरुपंच, भानुराम गुरुपंच, कैलास सीताराम, प्रभू डोंगरवार आदी उपस्थित होते.