उखडलेल्या रस्त्यांची ठिगळ लावून दुरूस्ती
By Admin | Updated: October 12, 2014 23:35 IST2014-10-12T23:35:18+5:302014-10-12T23:35:18+5:30
शहरातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते लगेच उखडले व जागोजागी खड्डे पडले. त्या रस्त्यांचे डागडुजीचे कार्य सध्या पालिकेच्या निर्देशानुसार कंत्राटदाराकडून केले जात आहे. या दुरूस्तींतर्गत

उखडलेल्या रस्त्यांची ठिगळ लावून दुरूस्ती
गोंदिया : शहरातील डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते लगेच उखडले व जागोजागी खड्डे पडले. त्या रस्त्यांचे डागडुजीचे कार्य सध्या पालिकेच्या निर्देशानुसार कंत्राटदाराकडून केले जात आहे. या दुरूस्तींतर्गत उखडलेल्या जागेवर ठिगळ लावले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.
शहरातील बाजार भागासह मुख्य चौकातील रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले होते. उन्हाळ््यात डांबरीकरण करण्यात आलेले हे रस्ते पहिल्याच पावसात उखडण्यास सुरूवात झाली. सिमेंट रस्त्यांवर असलेले डांबरीकरण जागोजागी उखडून तेथे खड्डे पडू लागले. येथील साईबाबा इन्फ्र्रास्ट्रक्चरला या रस्ता डांबरीकरणाचे काम देण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच रस्ते उखडू लागल्याने रस्ता डांबरीकरणाचे हे कार्य कंपनीच्या चांगलेच अंगलट आले आहे.
नियमानुसार संबंधीत एजेंसीलाच केलेल्या कामातील मेंटनंस करावयाचे असते व यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी ठरविण्यात आला आहे. त्यानुसार साईबाबा इन्फ्रास्ट्रक्चरलाच या रस्ता डांबरीकरणाची दुरूस्ती करणे बंधनकारक होते. त्यानुसार संबंधीत कंपनीकडून सध्या रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम शहरात सुरू आहे. या दुरूस्तींतर्गत मात्र उखडलेल्या जागेवर ठिगळ लावले जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी ठिगळ दिसून येत असून त्यांचेही आयुष्य किती दिवसांचे असा प्रश्न पडतो. तर संबंधीत एजेंसीलाच दुरूस्ती करावी लागते व त्यानुसार त्यांच्याकडून दुरूस्तीचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यांच्या दुर्गतीसाठी येथील गटार योजना कारणीभूत आहे. डांबरीकरण रस्त्यांवरील पाणी वाहून जात नसून रस्त्यांवरच जमा होत असल्याने रस्ते उखडत असल्याचे नगर परिषदेचे अभियंता दाते यांनी सांगीतले.
(शहर प्रतिनिधी)