येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

By Admin | Updated: March 6, 2015 01:44 IST2015-03-06T01:44:31+5:302015-03-06T01:44:31+5:30

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती...

Remove encroachment of farmland in Yerandi-Dev Mama Lake | येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

येरंडी-देव मामा तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण हटवा

बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी-देव येथील माजी मालगुजार तलावातील शेतजमिनीचे अतिक्रमण विनाविलंब हटविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ तथा वनअधिकार समिती येरंडीच्या वतीने सबंधितांना करण्यात आली आहे.
मामा तलावामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण करणाऱ्या दहा शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेत बहुमताने नोव्हेंबर २०१४ मध्ये पारित करण्यात आला. परंतु ठरावाची अंमलबजावणी न होता, त्या ठरावाला केराची टोपली दाखविण्यातच सबंधितांनी धन्यता मानली. त्वरित अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
येरंडी-देव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये १९६२ ते ६५ च्या दरम्यान मामा तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी तलावाची आराजी ३२ ते ३३ एकर होती. सदर तलावावर वेळोवेळी शासनाच्या वतीने माती काम करण्यात आले. पर्यायाने तलावाच्या पाळीची लांबी व रूंदी वाढत गेल्याने तलावातील आतील भाग विस्तीर्ण झाले. गावातील दहा लोकांनी तलावाच्या पोटामध्ये शेतजमीन काढून अतिक्रमण केले. गावातील मोजक्या लोकांनी काढलेल्या अतिक्रमण शेतजमिनीमुळे तलाव पाण्याने तुडूंब भरले. यानंतर अतिक्रमण धारकांच्या पिकांमध्ये पाणी शिरून धानाचे नुकसान होत असल्याचे दिसताच अतिक्रमणधारक शेतकरी स्वत:च्या मर्जीने वेळी-अवेळी तलावाचे गेट उघडून पाणी सोडतात. त्यामुळे मालकी हक्काच्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी धान उत्पादनापासून वंचित रहावे लागते.
तलावामध्ये अतिक्रमण करून शेतजमीन काढणाऱ्यांचे विनाविलंब अतिक्रमण काढण्यात यावे. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकारी तसेच येरंडी-विहीरगाव गट ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. येरंडी (देवी) येथील सार्वजनिक चौकातील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी हेमंत बारसे होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तलावातील अतिक्रमण काढण्यात यावा या एकमेव मुद्यावर चर्चा करण्यात आली. विषयाच्या अनुषंगाने एकमत न झाल्याने मतदानाने निर्णय घेण्यात आला.
अंमलबजावणी न झाल्यामुळे मालकी हक्काच्या जमीन धारकांत पाणी कुठे तरी मुरत आहे, असा सशंय निर्माण होत आहे. संबंधितांनी ठरावाची अंमलबजावणी केली नसल्याने त्या ग्रामसभेच्या ठरावाला अधिकारी वर्गाकडून केराची टोपली मिळाली असावी, असा सूर ग्रामस्थांमध्ये आहे.
मामा तलावातील अतिक्रमण करून शेतजमीन करणाऱ्यांचे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अन्यथा ग्रामस्थ तसेच वन अधिकार समिती येरंडी-देवच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Remove encroachment of farmland in Yerandi-Dev Mama Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.