दोन कंपन्यांकडून प्राप्त होणार रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:21 IST2021-04-29T04:21:57+5:302021-04-29T04:21:57+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र यासाठी शासकीय ...

दोन कंपन्यांकडून प्राप्त होणार रेमडेसिविर इंजेक्शन
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली होती. मात्र यासाठी शासकीय कोटा निश्चित करण्यात आला आहे. हा कोटा वाढवूृन जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर जिल्ह्याचा कोटा वाढवून देण्यात आला.
गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याशिवाय शहरातील विविध खासगी रुग्णालयांना जिथे कोविड रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यांनासुध्दा रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. खासगी रुग्णालयाला सनफार्मा कंपनीकडून १५० आणि जुबीलेंड कंपकडून ३०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनमुळे जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या दोन्ही कंपनीच्या संचालकांशी खा. प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी ४५० इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन गोंदिया जिल्ह्याच्या शासकीय कोट्याव्यतिरिक्त प्राप्त होणार आहे. जिल्ह्याच्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या कोट्यात सातत्याने वाढ करण्यासंदर्भात पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली. बुधवारीसुध्दा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या माध्यमातून रेमडेसिविर इंजेक्शनसंदर्भात ऑर्डर काढण्यात आल्याची माहिती आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्याला १२०० आणि भंडारा जिल्ह्याला १००० रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले आहे. यापुढे या दोन्ही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा वाढविण्यासाठी ते प्रयत्नरत आहे.