रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात करीत होते विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:18+5:30

गोंदियात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याच्या नादात असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया शहर पोलीस स्टेशन परिसरात रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 

Remadesivir injections were sold on the black market | रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात करीत होते विक्री

रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात करीत होते विक्री

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तिघांवर गुन्हा दाखल, ‘लोकमत’च्या वृत्ताला दुजोरा, सखोल चौकशी केल्यास रॅकेट येईल उघकीस

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविड रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत होती. हे रेमडेसिविर इंजेक्शन चक्क गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे ‘लोकमत’ने मागील तीन-चार दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्या बाजारासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्याला दुजोरा मिळाला आहे. 
गोंदियात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनअभावी कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याच्या नादात असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया शहर पोलीस स्टेशन परिसरात रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कोविड-१९ या आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  २० एप्रिल रोजी  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की, एकाकडे रेमडेसिविरची दोन इंजेक्शन्स आहेत. तो एका इंजेक्शनचे १५००० रुपयाप्रमाणे दोन इंजेक्शनचे ३० हजार रुपये मागत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह पांडुरंग शिंदे,  सहायक फौजदार लिलेन्द्रसिंह बैस, पोलीस नायक भेलावे, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, अरविंद चौधरी, महेश मेहर, इंद्रजित बिसेन, पोलीस शिपाई विजय मानकर यांचे पथक तयार करण्यात आले. 
या पथकास संजूकुमार बागडे (रा. गांधीवाॅर्ड, गोंदिया) हा विनापरवाना रेमडेसिविर इंजेक्शन किमतीपेक्षा जास्त दरात प्रत्येकी १५ हजार रुपयात विकत आहे, अशी माहिती मिळाली.  संजूकुमार बागडे याच्याकडे बोगस ग्राहक पाठवून गांधीवाॅर्ड, गोंदिया येथे सापळा रचण्यात आला. यानंतर बागडे हा रेमडेसिविरची दोन इंजेक्शन्स घेऊन आल्यानंतर पथकाने त्वरित छापा टाकून संजूकुमार बागडे यास ताब्यात घेतले. संजू विकास बागडे  याने हे इंजेक्शन दर्पण नागेश वानखेडे (रा. गांधीवाॅर्ड, गोंदिया) याच्याकडून आणल्याचे सांगितले. दर्पण वानखेडे यास रेमडेसिविर इंजेक्शन कुठून आणले, याबाबत विचारले असता, त्याने नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे (रा. गांधीवाॅर्ड, गोंदिया याच्याकडून आणल्याचे सांगितले. दोन रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करून त्याचे मला २० हजार रुपये आणून दया, असे सांगितले आहे, अशी माहिती दर्पणने दिली. 
पोलीस पथकाने नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे (रा. गांधीवाॅर्ड) यालाही ताब्यात घेतले. आरोपी संजू विकास बागडे, दर्पण नागेश वानखेडे, नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे (सर्व रा. गांधीवाॅर्ड, गोंदिया) या तिघांविरुध्द गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, १८८, ३४  सह परिशिष्ट २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख), (दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 

केटीएसच्या औषध भांडारातूनच रेमडेसिविरचा पुरवठा
कोविडच्या गंभीर रुग्णांना लावण्यासाठी आलेले रेमडेसिविर इंजेक्शन केटीएसच्या औषध भांडारातूनच या आरोपींना मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे.  आरोपी नीतेश ऊर्फ करण भीमराव चिचखेडे हा के.टी.एस. रुग्णालय, गोंदिया येथे कोविड १९ या संसर्गजन्य आजाराने संक्रमित होऊन उपचारासाठी भरती झालेल्या गरजू रुग्णांकरिता के.टी.एस. रुग्णालय येथील औषध भांडारात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन तो काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात होता, अशी कबुली दिली आहे.

 

Web Title: Remadesivir injections were sold on the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.