रेल्वे स्थानकावर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण
By Admin | Updated: May 3, 2017 00:55 IST2017-05-03T00:55:39+5:302017-05-03T00:55:39+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे स्थानकांवर प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्यासाठी कार्य केले जात आहे.

रेल्वे स्थानकावर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाद्वारे स्थानकांवर प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा प्रदान करण्यासाठी कार्य केले जात आहे. सोमवार (दि.१) गोंदिया रेल्वे स्थानकावर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर नवनिर्मित फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म क्रमांक १ तसेच ३ व ४ वर नवनिर्मित लिफ्टचे उद्घाटन भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी खा. नाना पटोले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून नियमित प्रस्थानाचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून केला. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सुविधा झाली आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म-१ वरून सोडण्यात यावी, ही गोंदियावासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे.
याशिवाय दिव्यांगांना रेल्वे सवलत मिळवून घेण्यासाठी येणाऱ्या समस्या लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरद्वारे १ व २ मे २०१७ रोजी गोंदिया स्थानकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत दिव्यांगांसाठी विशेष शिबिराचा शुभारंभ खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी दिव्यांगांनी आपल्यासोबत फोटोे, ओळखपत्र, अॅड्रेस प्रूफ, जन्म प्रमाणपत्र व चिकित्सेसंबंधी दस्तावेज आदी कागदपत्रे सोबत आणावे व शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार गोपालदास अग्रवाल, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी अर्जुन सिब्बल, मंडळातील इतर अधिकारी ए.के. सूर्यवंशी, वाय.एस. बाकडे, रमन मेठी, हरिंद्र मेठी, इतर लोकप्रतिनिधी व जनसमुदाय उपस्थित होते.(प्रतिनिधी)