नवे निर्बंध शिथिल करा अन्यथा रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:37+5:302021-04-09T04:31:37+5:30
गोंदिया : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक ...

नवे निर्बंध शिथिल करा अन्यथा रस्त्यावर उतरू
गोंदिया : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेताच नवीन निर्बंध लागू केले. त्यामुळे उद्योगधंदे संकटात आले असून यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगारसुद्धा बुडाला आहे. त्यामुळे शासनाने निर्बंध शिथिल करावे अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना जेव्हा जेव्हा शासनाने लागू केल्या तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांनी शासनाला सहकार्य केले. यापुढेही सहकार्याचीच भूमिका राहील. मात्र, ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू करून किराणा, डेली निड्स, दूध डेअरी, बांधकाम साहित्य आदी दुकाने वगळता सर्वच दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश लागू केले. या आदेशामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रमाचे वातावरण आहे. सरसकट दुकाने बंद ठेवण्याऐवजी काही कालावधी निश्चित करून ती पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. मागील वर्षीदेखील कोरोनामुळे तब्बल तीन महिने दुकाने बंद होती. त्यामुळे अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले, कामगारांचा रोजगार गेला, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरण्याची समस्या निर्माण झाली. यातून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा व्यवसाय बंद झाल्याने व्यापारी व यावर अवलंबून असलेले कामगारसुद्धा संकटात आले आहेत. त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करून निर्बंध शिथिल करण्याची मागणी शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
.....
दुकानांसमोर उभे राहून सर्व व्यापारी करणार विरोध
नवीन निर्बंध शिथिल करण्यात यावे या मागणीला घेऊन शहरातील सर्व व्यापारी शुक्रवारी (दि.९) एकत्र येणार आहेत. तसेच आपापल्या प्रतिष्ठानासमोर निदर्शनाचे व सरकारचा विरोध दर्शविण्यासाठी साखळी तयार करणार आहे. तसेच आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
............
कोरोना काय केवळ कपड्याच्या दुकानात येतो का?
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत; पण किराणा, डेली निड्सच्या दुकानातून कोरोनाचा शिरकाव होत नाही का? तो काय केवळ कपड्याच्या अथवा इतर दुकानांतूनच येतो, सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.