खंडित बिलाची तक्रार खारिज
By Admin | Updated: June 10, 2015 00:48 IST2015-06-10T00:48:26+5:302015-06-10T00:48:26+5:30
विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले.

खंडित बिलाची तक्रार खारिज
न्यायमंच : सुधारित बिल भरल्याने वीज पुरवठा सुरू
गोंदिया : विद्युत कंपनीने वीज पुरवठा खंडित करून त्या कालावधीचे बेकायदेशीर बिल शेतकऱ्याला पाठविले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एक लाख रूपये मिळावी म्हणून त्याने न्यायमंचात तक्रार दाखल केली. परंतु वीज कंपनीचे सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये सदर शेतकऱ्याने भरले व कंपनीने वीज पुरवठा पुर्ववत सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्याची सदर तक्रार न्यायमंचाने खारित केली.
केशवराव दाजीबा पाथोडे रा. दत्तोरा (ता.जि. गोंदिया) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या पाच एकर शेतील पाईपलाईनद्वारे पाणी पुरविण्यासाठी सन २००५ मध्ये विद्युत पुरवठा घेतला होता. सदर विद्युत पंप वाघ इटियाडोह डाव्या कालव्यावर बसविला होता. नियमित वीज बिल भरणे सुरू असतानाच अचानक डिसेंबर २०१० मध्ये वीज मीटर जळाले. त्यांनी वारंवार मीटर बदलविण्याचा अर्ज केला. मात्र त्यांना डिसेंबर २०१० चा एक हजार ८० रूपये व जून २०११ मध्ये दोन हजार २० रूपये असा एकूण तीन हजार १०० रूपये बिल आला.
तसेच कुठलीही सूचना न देता जानेवारी २०१२ मध्ये कंपनीने पुरवठा बंद केल्याने त्यांचे रबी पिकाचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. शिवाय मार्च २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीचे बेकायदेशीर बिल रद्द करावे. पुरवठा खंडित झाल्यामुळे मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई एक लाख १५ हजार रूपये मिळावी म्हणून त्यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केली.
विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबात, मीटर हे बॅकींश स्थितीमध्ये असल्याने रिडिंग घेणे शक्य नव्हते. शिवाय पुरवठा सुरू असल्याने सरासरी बिल देण्यात आले. परंतु ग्राहकाने थकीत बिलाचा भरणा न केल्याने आॅक्टोबर २०१२ मध्ये तात्पुरता पुरवठा खंडित करण्यात आला.
तसेच लोकशाही दिनी केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारकर्ता व सहायक अभियंता यांच्यात आपसी समझोता झाला. त्यात तक्रारकर्त्याने सुधारित बिल दोन हजार ४०० रूपये व पुनर्जोडणीचे १०० रूपये भरावे असे ठरले. शेतकऱ्याने सदर रक्कम भरल्यावर वीज पुरवठा २७ जानेवारी २०१४ रोजी पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे नमूद केले.
यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली. यात वीज कंपनीने पाथोडे यांना बिल दुरूस्त करून सुधारित बिल दिले. त्याचा भरणा करण्यात आला. त्यामुळे वीज कंपनीच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत नाही. शिवाय शेतीला झालेल्या नुकसानीचा कुठलाही पुरावा पाथोडे यांनी प्रकरणात सादर केला नाही. त्यामुळे शेतकरी पाथोडे यांची तक्रार न्यायमंचाने खारिज केली. (प्रतिनिधी)