मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेचे प्रांतीय अधिवेशन
By Admin | Updated: February 10, 2016 02:20 IST2016-02-10T02:20:58+5:302016-02-10T02:20:58+5:30
विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेचे प्रांतीय अधिवेशन रविवारी (दि.७) गुर्जर क्षत्रिय समाजवाडी रेलटोली येथे पार पडले.

मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेचे प्रांतीय अधिवेशन
संघटनेची वाटचाल वटवृक्षाप्रमाणे : अन्याय होणाऱ्या कर्मचाऱ्याने संघटनेला कळवावे
गोंदिया : विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेचे प्रांतीय अधिवेशन रविवारी (दि.७) गुर्जर क्षत्रिय समाजवाडी रेलटोली येथे पार पडले. उद्घाटन विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांच्या हस्ते, शिक्षण व आरोग्य विभाग जि.प. गोंदियाचे सभापती पी.जी. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, कृषी व पशूसंवर्धन सभापती छाया दशरे, माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे, विनोद अग्रवाल, अपूर्व अग्रवाल, अशोक बरियेकर, आर.पी. रामटेके, डी.एम. मालाधरी, नरेश व्याख्या, सुनील तरजुले उपस्थित होते.
प्रास्ताविक संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम यांनी केले. त्यांनी संघटनेची स्थापना व विस्तार सांगून कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. यात सन २००५ नंतर लागणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना, कंत्राटी आरोग्य सेवक-सेविकांना सेवेत कायम करणे, शासनाच्या संपूर्ण विभागाच्या नोकर भरतीची कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करून सेवाशर्ती लागू करणे, पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांचे मानधन सहा हजार रूपये करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बेसिक पे लागू करण्यात यावे, शिक्षकांची बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांपासून मुक्तता करून ही कामे बेरोजगार संघटनेकडे द्यावी व पोषण आहाराच्या कामापासून शिक्षकांना मुक्त करून इतर स्वायत्त संस्थांकडे द्यावे यांचा समावेश होता. अधिवेशनात सदर प्रस्ताव पारित करण्यात आला. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांनी संघटनेला कळवावे, संघटना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, असे आवाहन केले.
याप्रसंगी आ. राजेंद्र जैन म्हणाले, आपण विपक्षामध्ये असलो तरी संघटनेने मांडलेल्या सर्व मागण्या योग्य व रास्त आहेत. त्याकरिता माझ्याकडून सर्वोतोपरी मदत करणार व शासकीय दरबारी सोडविण्याचा प्रयत्न करणार. तसेच संघटनेला स्थायी कार्यालयाबद्दल जागा उपलब्ध झाल्यास कार्यालय बांधकामाची हमीसुद्धा त्यांनी दिली.
आ. अग्रवाल यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले अपूर्व अग्रवाल, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनीसुद्धा संघटनेच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. संजय टेंभरे यांनी संघटनेचे कार्य अंशकालीन संघटनेपासून सुरू झाले असून एका रोपट्याचे रूप आता विशाल वटवृक्षासारखे झाल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पी.जी. कटरे यांनी, शिक्षकांच्या व इतर संघटनेच्या प्रलंबित मागण्या, आंतरजिल्हा बदली तसेच आरोग्य विभागातल्या समस्यांचे निराकरण करून कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली.
संचालन प्रा.वाय.पी. मेश्राम व प्रा. सिंधू वंजारी यांनी केले. आभार संघटनेचे महासचिव लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाला आनंद जांभूळकर, चंद्रशेखर, यू.वाय. टेंभरे, सुनील भगत, विवेक राऊत, महेंद्र कांबळे, डी.डी. रामटेके, विनोद जांभूळकर, नूरजहा पठान, अनिता जॉन, संध्या लांजेवार, साधना साखरे, भारती तिडके, शंभरकर, वंदना वाहणे, जी.डी. रंगारी, पंचशीला मेश्राम तसेच इतर जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)