धानपिकांवर किडींच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटणार

By Admin | Updated: September 21, 2014 23:53 IST2014-09-21T23:53:20+5:302014-09-21T23:53:20+5:30

जिल्ह्यात हलक्या जातीचे धानपीक निघू लागले आहे. मात्र पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते.

Reduction of yield on Paddy Pests | धानपिकांवर किडींच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटणार

धानपिकांवर किडींच्या प्रादुर्भावाने उत्पन्न घटणार

खातिया : जिल्ह्यात हलक्या जातीचे धानपीक निघू लागले आहे. मात्र पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सुरुवातीला कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. आता त्यावर रोग लागल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आता धानपिकावर खोडकिडा, करपा हा रोग जास्त दिसून येत आहे. शेतकरी आपल्या पिकाला वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यावर्षी पाऊस लांबल्याने पीक उशिरा लागले. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे होते. पाऊस कमी असल्यामुळे धानपीक बरोबर तयार झाले नाही. ज्यांच्याकडे सिंचनाचे साधन नाही त्यांची रोपे करपू लागली आहेत.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा पैशाचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देवून धानाचे रोप वाचविले होते. मात्र पावसाअभावी आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. सध्या पिकावरील रोगापासून त्रस्त झालेले शेतकरी शेती करायचे कसे? या विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात काहीही लावले नाही. अनेक शेतकरी धानपिकाऐवजी नगदी पिकाकडे वळले आहेत. कसेबसे धानपीक निघाले तर शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही बरोबर मिळत नाही. उत्पन्न मिळवून कर्जमुक्त होण्यासाठी एवढा पैसा खर्च करूनही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे.
सालेकसा : सालेकसा तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरूवातीला जून महिन्यात ३० टक्के पर्जन्यमान होते. मात्र आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवडीयोग्य पाऊस झाल्यामुळे धानपिकांची रोवणी १६ हजार १०० हेक्टरमध्ये करण्यात आली. धान पिकावर प्रामुख्याने खोडकिडा, गादमाशी, पाने गुंडाळणारी अळी, मावा, तुडतुडा या किडींचा व करपाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
धान पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षीसुध्दा शेतकरी हवालदिल होताना दिसत आहेत. पाने गुंडाळणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. या किडीचा नायनाट करण्यासाठी डायक्लोरोफास किंवा मिथाईल पॅराशिआन २ टक्के भुकटी २५ किलो किंवा क्लोरोपॉयव्हॉस २० ई.सी. २५०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करण्याचे मार्गदर्शन कृषी खात्याने केले आहे. कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत या आठवड्यात भात पिकावरील कीडरोगवर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे माहिती पुरविण्यात येते. सन २०१४-१५ या वर्षात पीक परिस्थितीचा समाधानकारक अंदाज कृषी खात्याने वर्तविला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणात यावर्षी पिकांच्या उत्पन्नात कमालीची घट होणार असल्याची माहिती प्राप्त आहे. (वार्ताहर)

Web Title: Reduction of yield on Paddy Pests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.