गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज
By Admin | Updated: February 28, 2017 00:56 IST2017-02-28T00:56:41+5:302017-02-28T00:56:41+5:30
विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज
आजपासून बारावीची परीक्षा : २३ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी ६९ केंद्र
गोंदिया : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी बारावीची परीक्षा मंगळवार दि.२८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. यंदा एकाही केंद्रावर कॉपीसारखा गैरप्रकार घडू नये यासाठी यंत्रणेला योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भरारी पथकांना तालुके नेमून देण्यात आले असून केंद्रांवरही चोख बंदोबस्त राहणार आहे.
परीक्षा अधिनियमानुसार परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र संचालक व अतिरिक्त केंद्र संचालक यांना सूचना देऊन एका केंद्रावर सात व वर्गखोलीत तीन वेळा कॉपी (आक्षेपार्ह साहित्य) आढळल्यास ‘सामूहिक कॉपी’ सुरू असल्याचे गृहित धरून कारवाई केली जाणार आहे. परीक्षार्थ्यांनी वह्या, पिशवी किंवा मोबाईल आणू नये, प्रवेश पत्र व पेन घेऊन यावे. ज्या वर्गात कॉपी चालत असेल त्यासाठी त्या वर्गातील पर्यवेक्षकांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे.
मागच्या वर्षी रसायनशास्त्राच्या पेपरला कोसमतोंडी येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी करताना पकडण्यात आले होते. त्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हाभर ६९ केंद्र यावर्षी बारावीचे २३ हजार २१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सात भरारी पथकांची गस्त
दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक असे सात पथक विविध केंद्रांवर सतत गस्त घालणार आहेत.
‘त्या’ १८९ विद्यार्थ्यांचा निकाल लागलाच नाही
मागच्या वर्षी कोसमतोंडी येथील फुलीचंद भगत कनिष्ठ महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या पेपरला सामूूहिक कॉपी करताना १८९ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. भरारी पथकाने त्या १८९ विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रार केली. न्यायालयातूनही पथकाच्या बाजूने निकाल देण्यात आला. मात्र कॉपी करणाऱ्या त्या १८९ विद्यार्थ्यांचा निकाल अद्यापही लागला नाही. यंदा त्या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.