रेशन माफिया सक्रिय

By Admin | Updated: October 30, 2015 02:03 IST2015-10-30T02:03:05+5:302015-10-30T02:03:05+5:30

आमगाव तहसील कार्यालयातील अन्न निरीक्षक महेंद्र पंढरीनाथ गांगुर्डे याने रेशन माफियांच्या बळावर गैरमार्गाने संपत्ती गोळा केली.

Ration mafia active | रेशन माफिया सक्रिय

रेशन माफिया सक्रिय

नागरिकांचा जल्लोष : लाचखोर अन्न निरीक्षकाच्या अवैध संपत्तीची विल्हेवाट?
आमगाव : आमगाव तहसील कार्यालयातील अन्न निरीक्षक महेंद्र पंढरीनाथ गांगुर्डे याने रेशन माफियांच्या बळावर गैरमार्गाने संपत्ती गोळा केली. सामान्य नागरिकांना वेठीस धरून सदर अधिकाऱ्याने रेशनचा काळाबाजार तालुक्यात पुढे केला होता. कुणालाच न जुमानणाऱ्या या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पैसे घेताना पकडले. त्याचवेळी अधिकाऱ्याने जमवलेली बेहिशेबी रोख व वस्तुंची विल्हेवाट लावण्यात रेशन माफियांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची माहिती आहे.
तहसील कार्यालयातील अन्न निरीक्षक महेंद्र गांगुर्डे याने सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रेशनचा, रेशन माफियांच्या बळावर काळाबाजार केला होता. अन्नधान्याचा पुरवठा यंत्रणा पाठिशी घालून या अधिकाऱ्याने सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या रेशनचा पुरवठा होणाऱ्या साठवण केंद्रातूनच विल्हेवाट लावल्याचे कार्य पुढे उघड झाले आहे. त्यामुळे तालुक्यात नागरिकांची रेशन मागणीसाठी ओरड निर्माण झाली होती. परंतु अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे या अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा अभारण्यात आला नाही. त्यामुळे गांगुर्डे या अन्न निरीक्षकाचे मनोबल अधिक उंचावले होते.
शासनाने डाळीचे अवैध साठे साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. याच बळावर तालुक्यात खासगी दुकानदारांकडे तहसील विभागाकडून चौकशी प्रारंभ करण्यात आली होती. या चौकशीचा लाभ उचलत अन्न निरीक्षक महेंद्र गांगुर्डे याने दुकानदारांना वेठीस धरून पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत.
गांगुर्डे याने अनेक खासगी दुकानदारांना विनाकारण कारवाईचा धसका दिला होता. तर कार्यालयात बोलवून पैश्याची मागणीसुद्धा करीत होता. त्यामुळे खासगी दुकानदार या निरीक्षकामुळे वैतागले होते. यातच तेल विक्रीचे एफजीएल लायसन्स नसल्याचे कारण पुढे करून व्यावसाईकांकडून मोठी रक्कम घेण्यात येत होती.
विजय अग्रवाल यांच्या दुकानातील साहित्याची चौकशी व कारवाई मागे घेण्यासाठी पैश्याची मागणी अन्न निरीक्षक महेंद्र गांगुर्डे याने केली होती. यात २७ आॅक्टोबरला तहसील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सदर अधिकाऱ्याला पैसे घेताना पकडले.
अन्न निरीक्षक महेंद्र गांगुर्डे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू असताना रेशन माफियाने पाठबळ उभे करून त्या लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. तर अधिकाऱ्याने गैरमार्गाने जमवलेली रोख व वस्तुंची माहिती प्रतिबंधक विभागाच्या हाती लागू नये म्हणून एका रेशन माफियाने अन्न निरीक्षक यांच्या घरातील अवैध संपत्तीची विल्हेवाट लावली असल्याची विश्वसनीय माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांच्या घरातील चौकशी केल्यावर त्यांना रिकाम्या हाती परतावे लागल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)

नागरिकांचा जल्लोष व घोषणा

अन्न निरीक्षकाने सामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांना पैश्यासाठी हैराण केले होते. अनेकांचे कार्य प्रलंबित ठेवून फक्त पैसा घेतल्याशिवाय कोणतेच कार्य होत नसल्याने नागरिकांचा अंत पणाला लागला होता. यातच त्या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने नागरिकांना न्याय मिळाला. हे बघून नागरिकांनी अटक झालेल्या अधिकाऱ्यासमोर फटाके फोडून भ्रष्टाचार मुर्दाबादच्या घोषणा देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना लाचखोर अधिकारी, याला कठोर दंड करा, अशी मागणी करीत अटकेचा जल्लोष साजरा केला.

अवैध संपत्तीचा छडा लागणार काय?
तहसील कार्यालयातील अन्न निरीक्षक महेंद्र गांगुर्डे यांनी विभागात गैरमार्गाने संपत्ती गोळा केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. परंतु योग्य दिशेने या अधिकाऱ्याविरूध्द जोपर्यंत चौकशी केली जात नाही तोपर्यंत जमवलेल्या अवैध संपत्तीचा छडा लागणार नाही. त्यासाठी एसीबीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

Web Title: Ration mafia active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.