तीन महिन्यांपासून रेशनची तूरडाळ झाली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:58+5:302021-02-05T07:44:58+5:30
गोंदिया : दिवाळीपूर्वीपर्यंत जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना तूरडाळीचा पुरवठा केला जात होता; मात्र मागील तीन महिन्यांपासून तूरडाळीचा साठा उपलब्धच करून देण्यात ...

तीन महिन्यांपासून रेशनची तूरडाळ झाली गायब
गोंदिया : दिवाळीपूर्वीपर्यंत जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांना तूरडाळीचा पुरवठा केला जात होता; मात्र मागील तीन महिन्यांपासून तूरडाळीचा साठा उपलब्धच करून देण्यात आला नाही. त्यामुळे रेशनकार्डवरील तूरडाळ मागील तीन महिन्यांपासून गायब झाल्याचे चित्र आहे. तर रेशनकार्डधारक तूरडाळ आली का म्हणून स्वस्त धान्य दुकानात चकरा मारत आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून रेशनकार्डवरील तूरडाळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार ४४७ रेशनकार्डधारक आहेत. यात १४४५२९ केशरी रेशनकार्डधारक, ७८५१८ पिवळे रेशनकार्डधारक आणि ४८४२ पांढरे रेशनकार्डधारक आहेत. या रेशनकार्डधारकांना प्रतिकार्ड १ किलो याप्रमाणे तूरडाळीचे एकूण ९९८ स्वस्त धान्य दुकानातून वितरण केले जाते. मागीलवर्षी नाेव्हेंबर महिन्यापर्यंत रेशनकार्डधारकांना नियमितपणे तूरडाळीचे वाटप करण्यात आले. मात्र मागील तीन महिन्यांपासून शासनाकडून तूरडाळीचा पुरवठा न झाल्याने वितरण पूर्णपणे ठप्प असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात पुरवठा विभागाला विचारणा केली असता शासनाकडे तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. त्यांच्याकडून पुरवठा होताच स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करून वितरण करण्यात येईल, असे सांगितले.
......
डाळ नसल्याच्या तक्रारी कुठे
बाजारपेठेत तूरडाळीचे भाव १०० प्रतिकिलो आहे, तर रेशनकार्डवर ती सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडीफार मदत होत होती. पण मागील तीन महिन्यांपासून रेशनकार्डवर तूरडाळ मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आहे. तालुका स्तरावर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत.
.........
रेशनवर काय मिळते
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, तूरडाळ, चनाडाळ, साखर, तेल आदी धान्य उपलब्ध करून दिले जाते. गोंदिया जिल्ह्यात मका उत्पादन घेतले जात असल्याने आता रेशनकार्डधारकांना मका पुरवठा केला जात आहे. मात्र मका चांगल्या प्रतीचा नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याचा पुरवठा बंद करण्यात आला होता. सध्या रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, साखर उपलब्ध करून दिली जात आहे.
........
रेशनकार्डवरील रॉकेल गेले कुठे
ज्या रेशनकार्डधारकांकडे गॅस सिलिंडर नाही, अशा रेशनकार्डधारकांना युनिटनुसार रॉकेल उपलब्ध करून दिले जाते. पुरवठा विभागानेसुध्दा रॉकेल उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगते; मात्र संपूर्ण जिल्ह्याभरातील रेशनकार्डधारकांची रॉकेल मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे रॉकेल नेमके कुठे जाते, हासुध्दा संशोधनाचा विषय आहे.
......
एकूण रेशनकार्डधारक
२२३४४७
पिवळे रेशनकार्डधारक
७८५१८
केशरी रेशनकार्डधारक
१४४५२९
पांढरे रेशनकार्डधारक
४८४२