शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘अंत्योदय’चे रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:18 IST2016-07-31T00:18:48+5:302016-07-31T00:18:48+5:30
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार तुटतो. आधीच घरातील परिस्थिती हलाखीची, ....

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘अंत्योदय’चे रेशन
डीएसओ सवाई : मानवीय दृष्टिकोनातून घेणार निर्णय
मनोज ताजने गोंदिया
कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आधार तुटतो. आधीच घरातील परिस्थिती हलाखीची, त्यात घरातील कर्त्या पुरूषाचा सहारा अचानक नाहीसा झालेल्या कुटुंबाची स्थिती फार वाईट होते. त्यामुळे अशा कुटुंबांना शासनाच्या अंत्योदय योजनेतून रेशन कार्डवरील स्वस्त साहित्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्यांदा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते काही दिवसांपूर्वीच रुजू झाले आहेत. या जिल्ह्याचा त्यांना संपूर्ण अभ्यास आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना कशा पद्धतीने राबविल्या जात आहेत, प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यासाठी काय नवीन उपक्रम राबविले जात आहेत याबद्दलची माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमधून दिली.
आधार लिंकिंगमध्ये राज्यात सहाव्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या आधार लिंकींगचे काम ९५ टक्के झाले आहे. तसेच सर्व रेशन कार्डांपैकी ६५ टक्के कार्डांचे आधार लिंकिंग झाले आहे. हे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढे येणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’साठी हे आधार लिंकिंग करणे प्रत्येक रेशन कार्डधारकासाठी गरजेचे आहे. त्याशिवाय न केल्यास स्मार्ट कार्ड मिळणार नाही आणि स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येईल. त्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या दुकानदाराकडे अर्ज भरून देऊन आधार कार्डची झेरॉक्स त्वरित द्यावी, असे आवाहन सवाई यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबातील महिलेच्या नावाने गॅस सिलींडर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात केंद्र सरकारकडून १६०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. यात शेगडी व सिलींडरचे रिफिल संबंधित ग्राहकाला स्वत: करायचे आहे. २०११ च्या सामाजिक-आर्थिक सर्व्हेनुसार तयार केलेल्या बीपीएल कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या कुुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे त्यांची यादी गॅस एजन्सीधारकांच्या कार्यालयांत लावण्यात आली आहे. त्यात आपले नाव आहे का, याची खात्री करून महिलांना नंतर योजनेसाठी अर्ज करावा.
जिल्ह्यात १ लाख ४५ हजार गॅस कनेक्शनधारक आहेत. त्यापैकी ४९६१ ग्राहकांनी शासनाच्या अनुदानित गॅसचा त्याग केला आहे. जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात बीपीएल आणि अंत्योदयच्या रेशन कार्डवर तूरडाळ दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १६७४ क्विंटल नियतन मंजूर झाले आहे. प्रतिकार्ड एक किलो डाळ १२० रुपये दराने दिली जाणार असल्याचे यावेळी सवाई यांनी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात डिसेंट्रलाईज प्रोक्युरमेंट सिस्टम लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय खाद्य निगमकडून धान्याची उचल न करता स्थानिक स्तरावरच धान खरेदी करून तो स्वस्त धान्य दुकानांमार्फत कार्डधारकांना मिळेल. यात शासनाचा वाहतूक खर्च वाचणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांनी सांगितले.