रानडुकराची शिकार करणारे गजाआड
By Admin | Updated: March 16, 2017 00:18 IST2017-03-16T00:18:21+5:302017-03-16T00:18:21+5:30
वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगावअंतर्गत येणाऱ्या परसटोला येथील गट क्र.३५५ चनाबोडी येथे अवैधपणे रानडुकराची शिकार करुन ....

रानडुकराची शिकार करणारे गजाआड
दोन आरोपींना अटक : २७ पर्यंत न्यायालयीन कोठडी
बोंडगावदेवी : वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगावअंतर्गत येणाऱ्या परसटोला येथील गट क्र.३५५ चनाबोडी येथे अवैधपणे रानडुकराची शिकार करुन मांस विक्री करीत असताना आढळून आलेल्या २ आरोपींना गजाआड करण्यात वनविभागाचे अधिकारी छत्रपाल रहांगडाले यांच्या पथकास यश आले. पतीराम कुसन कोरेटी (५५) व सत्यवान रामचंद्र तोरे (३१) रा. परसटोला अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय गोठणगाव यांच्याकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, १२ मार्चच्या पहाटे ४ च्या सुमारास सुगावा लागताच परसटोला येथील मुलचंद पेंदाम यांच्या राहत्या घरी वनविभागाच्या पथकाने छापा मारला. त्यात गावातील पतीराम कोरेटी, सत्यवान तोरे यांनी जंगलातील ३ रानटी डुकरांची शिकार करुन मांसाची विल्हेवाट लावत असताना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावर रानडुकराचे ३ मुंडके, १० खुरा अंदाजे ३ किलो मांस भाजत असताना आढळून आले. सदर आरोपींना त्याच क्षणी ताब्यात घेवून शिकारी करिता वापरलेले साहित्य व मास हस्तगत करण्यातआले. अवैधपणे रानडुकराची शिकार केल्याच्या आरोपावरुन वन गुन्हा क्रमांक १६०/२०१७ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चेकलम २,९,३१, ३९,५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदवून पतीराम कोरेटी, सत्यवान तोरे या दोन आरोपींना गजाआड करण्यात आले. अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात सादर करुन २७ मार्च पर्यंत त्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडी मिळविण्यात आली. उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)