रणधुमाळीला आला वेग
By Admin | Updated: June 26, 2015 01:36 IST2015-06-26T01:36:07+5:302015-06-26T01:36:07+5:30
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतला आहे.

रणधुमाळीला आला वेग
गोंदिया : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रसचे विधिमंडळातील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल पटेल हे दिग्गज नेते दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत.
जिल्ह्यात खरी लढत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख तीन पक्षातच आहे. त्यामुळे तीनही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कमी असल्यामुळे मतदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी नेते आपलीही आपली ताकद पणाला लावणार आहेत.
दरम्यान नामांकन रद्द झाल्यामुळे अपिलात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समित्यांच्या सहा मतदार संघातील उमेदवारांसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत बुधवारी ठेवली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या २५ तर पंचायत समित्यांच्या ८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या आता २३७ तर पंचायत समित्यांच्या १०६ मतदार संघांमधील उमेदवारांची संख्या ४२३ झाली आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा नागऱ्यात
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाजता जाहीर सभा शुक्रवारी २६ जून रोजी दुपारी १ नागरा येथील मोहरानटोलीच्या मैदानावर होणार आहे. या सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, खा.नाना पटोले, खा.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्यासह भाजपाचे अनेक माजी आमदार व पदाधिकारी उपस्थित राहतील.
राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र विधीमंडळाचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी दि.२६ व २७ रोजी विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचे बिरसी विमानतळावर आगमन होईल. २.३० वाजता गोरेगाव, ४ वाजता चिखली (ता.सडक-अर्जुनी), ६ वाजता नवेगावबांध आणि रात्री ८ वाजता अर्जुनी मोरगाव तालुक्यात सभेला मार्गदर्शन करतील. दि.२७ ला दुपारी ३ वाजता कामठा, ४ वाजता नवेगाव (धापेवाडा), ५ वाजता अर्जुनी (ता.तिरोडा), ६.३० ला सेजगाव, रात्री ८.३० ला पांढराबोडी आणि ९ वाजता नागरा येथील सभेला मार्गदर्शन करतील. यावेळी त्यांच्यासोबत राज्य विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.गोपालदास अग्रवाल, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि गोंदिया जिल्हा प्रभारी कृष्णकुमार पांडे, माजी आ.रामरतन राऊत व इतर पदाधिकारी राहतील.
अशोक चव्हाण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण शुक्रवारी (दि.२६) एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमार्गे चव्हाण दुपारी १२.३० वाजता सौंदड, दुपारी २.३० वाजता देवरी, ४.३० वाजता साकरीटोला, सायंकाळी ६ वाजता रिसामा आणि रात्री ८ वाजता खमारी येथील सभांना चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल, अ.भा. काँग्रेस कमिटीचे सचिव तथा प्रदेश सहप्रभारी आ.बाला बच्चन, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, कृष्णकुमार पांडे आदी राहणार आहेत.
प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल शनिवारी (दि.२७) आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव तालुक्यात सभा घेणार आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता सोनी, ११.१५ वाजता कुऱ्हाडी, १२ वाजता फुलचूरटोला, दुपारी १२.४५ वाजता खमारी, १.३० वाजता आसोली, २.१५ वाजता नागरा, ३ वाजता दासगाव (बु), ४ वाजता काटी, ४.३० वाजता धामणगाव, ५ वाजता अर्जुनी, ५.४५ वाजता सिरपूर येथे प्रचारसभेला मार्गदर्शन करतली. ६.३० पासून रात्री १० पर्यंत आमगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सभा घेतील. (जिल्हा प्रतिनिधी)