रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ५ दिवसापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:48+5:302021-03-31T04:28:48+5:30
बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ...

रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ५ दिवसापासून बंद
बाराभाटी : रामपुरी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ही योजना मागील ५ दिवसांपासून बंद पडून आहे. सुमारे ७ गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना बंद पडल्याने गावकऱ्यांना दूरवर शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पंपाची लवकर दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी नियमित व भरपूर मिळावे या उद्देशातून माजी खासदार महादेवराव शिवणकर यांनी रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना स्थापन केली होती. या योजनेअंतर्गत गोठणगाव तलावातील पाण्याची उचल करून एरंडी दर्रे गावात फिल्टरद्वारे स्वच्छ करून ते रामपुरी, येलोडी, जांभळी, धाबेटेकडी, धाबेपवनी, जबरखेडा, एरंडी दर्रे या गावांना नियमित पुरविले जाते. परंतु मागील काही काळात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही योजना महिन्यातून ५ दिवस चालू व २५ दिवस बंद राहण्याचे दिवस आले आहेत.
नेमक्या होळीच्या सणातच या योजनेच्या मोटार जळाल्या म्हणून मागील ५ दिवसांपासून ही योजना बंद आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे समाविष्ट सर्व गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या योजनेत समाविष्ट गाव धाबेटेकडी येथील शेतातून नागरिकांना पाणी आणावे लागत होते. ही समस्या गावातील सामाजिक कार्यकर्ते संदीप राहिले यांनी यशवंत गणवीर यांना सांगितले असता त्यांनी ताबडतोब आपल्या खर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला.
ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अभियंता गुटखे यांच्याप्रति चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही पाणीपुरवठा योजनेला एक पंप सुरू असूनही एक पंप जास्तीचा लावलेला असतो. परंतु येथील दोन्ही पंप बंद पडूनसुद्धा प्रशासन झोपेत आहे. त्यामुळे या आदिवासी परिसरातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
--------------------------
त्वरित पाणीपुरवठा सुरू करा
उन्हाळा आता आपल्या रंगात येत असून आता खाण्यापेक्षा पाण्याची जास्त गरज भासत आहे. अशातच योजना बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे नागरिक चांगलेच नाराज आहेत. पंपांची त्वरित दुरुस्ती करून योजना लवकरात लवकर सुरू करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.